नियोजनाचा बोजवारा उडालेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेचा कारभार सुधारण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) आयुक्त गरजेचा आहे. त्यामुळे महापालिकेत आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी, अशी मागणी भाजपच्या डोंबिवलीतील नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ही मागणी करत या नगरसेवकांनी विद्यमान आयुक्त मधुकर अर्दड यांच्याविरोधात एकप्रकारे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली आहे.
रामनाथ सोनवणे यांची आयुक्तपदावरून शासनाने उचलबांगडी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे भाजपच्या नगरसेवकांनी आभार मानले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व विकास प्रकल्प ठप्प झाले आहेत. सिमेंट रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. पाणी टंचाईचा प्रश्न अनेक भागात आहे. शासनाकडून निधी येणे बंद झाले आहे. हा डोलारा सावरण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. राजकीय दबावाला बळी न पडणारे व आयएएस श्रेणीतील आयुक्त महापालिकेला दिला तर येथील अस्वस्थ असलेले रहिवासी शासनाला दुवा देतील, असे पत्र भाजपचे उपमहापौर राहुल दामले तसेच नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहेत. मधुकर अर्दड अतिशय संथपणे काम करीत असून झटपट निर्णय घेत नाहीत, अशी तक्रारही करण्यात आली आहे.