ठाणे : राज्य मंत्रिमंडळाने कारखाने व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली आहे. यापुढे दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रतिदिन ९ तास तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास प्रतिदिन १२ तास काम करावे लागणार आहे. त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देत, सरकारवर टीका केली आहे.

कामगार टंचाईवर मात करणे, उद्योगांची कार्यक्षमता वाढवणे तसेच राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण होवून विदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी या हेतूने राज्य मंत्रिमंडळाने कारखाने व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासात वाढ केली आहे. यापुढे दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रतिदिन ९ तास तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारास प्रतिदिन १२ तास काम करावे लागणार आहे.

कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ६५ मध्ये कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तास होती, ती आता १२ तासांपर्यंत करण्यात आली आहे. कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे होता, तो आता ६ तासानंतर ३० मिनिटे करण्यात आला आहे. आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासांवरून १२ तास करण्यात आला आहे. त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.

उद्योगपतींचे खिसे भरणे हे सरकारचे काम नाही

जेव्हा – जेव्हा शासनाचा ताबा उद्योगपती घेतात. तेव्हा – तेव्हा कामगारांचे शोषण होते, याला इतिहास साक्ष आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना व कामगार कायदे तयार करताना कामाचे तास किती असावेत, याचे व्यवस्थित नियमन केले आहे. असे असताना कामाचे तास वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा कामगारांच्या श्रमाचा अवमान आहे. कारण, त्यांच्या श्रमातूनच मुंबई आणि महाराष्ट्र उभा राहिला आहे. आज मुंबई आणि महाराष्ट्र जे शोभून दिसत आहे, त्यामागे कामगारांनी गाळलेला घामच आहे. कामगारांचे ‘शोषण’ आणि उद्योगपतींचे ‘पोषण’ करणे अर्थात उद्योगपतींचे खिसे भरणे हे सरकारचे काम नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सरकारचा धिक्कार असो

कार्ल मार्क्स याने लिहून ठेवले आहे की, “जगातील कामगारांनो, एकत्र या! तुमच्याकडे तुमच्या साखळ्यांशिवाय गमावण्यासारखे काहीही नाही!” सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढावे लागेल. कामगारांनी कधी शोषण सहन केले नाही अन् या पुढे करणारही नाही. उद्योगपतींची दलाली करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.