ठाणे : राज्यात वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असून एका अहवालामध्ये मालेगाव, जालना आणि जळगाव या शहरांमध्ये धूळीकणांची पातळी सर्वाधिक नोंदविली गेली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत प्रदूषणामध्ये सर्वाधिक वाढ होत असून फक्त पावसाळ्यामध्ये प्रदूषणातून तात्पुरता दिलासा मिळत असल्याचेही अहवालात अधोरेखित केले आहे.

मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता किंचित सुधारली तरीही हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी हानीकारक पातळीवर नोंदविली जाते. तर ठाणे शहरात बांधकामांची धूळ, वाहतुक कोंडी आणि औद्योगिक कामांचा फटका शहराला बसत आहे.

गेल्याकाही वर्षांमध्ये राज्यात वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. विविध प्रकल्पांची कामे, बांधकामे, वाहनांतून निघणारा धूर यामुळे वायू प्रदूषणात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. पर्यावरण, हवामान बदल, स्वच्छ हवा या विषयांवर काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशन आणि एन्व्हारोकॅटलिस्ट या संस्थेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारा अहवाल तपासला.

मागील आठ वर्षांमध्ये राज्यातील शहरांतील वायू प्रदूषणाचा अहवाल सादर केला. राज्यातील हवेच्या गुणवत्तेची चिंताजनक आकडेवारी उघडकीस आली आली. २०२४-२५ मध्ये निम्म्याहून अधिक शहरांमध्ये ‘राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकां’पेक्षा धूलिकणांची पातळी (पीएम २.५) जास्त आढळली असून शहरांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त धूलिकण (पीएम १०) आढळून आले आहेत.

२०२४-२५ मध्ये मालेगावमध्ये सर्वाधित पीएम २.५ ची पातळी सरासरी ५१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदविली गेली. त्यानंतर जालना येथील ५० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि जळगाव येथे ४८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी पातळी नोंदविली. सर्वांत कमी पातळी सांगली येथील असून येथे पीएम २.५ ची पातळी २८ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी होती.

धूलिकण (पीएम२.५) हे सर्वात घातक असून शरिरातील फुफ्फुस आणि रक्तप्रवाहात खोलवर जातात. त्यामुळे श्वसनाचे आजार, हृदयविकार, अकाली मृत्यूचा धोका वाढतो. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत अशा नागरिकांना याचा सर्वाधिक परिणाम होतो. पीएम १० मुळे श्वसनाचे विकार, हृदयासंदर्भात आजार होऊ शकतात. हे धुलिकण श्वासावाटे शरिरात प्रवेश करतात.

मुंबईमध्ये वार्षिक सरासरी पीएम २.५ ची पातळी ३५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदविली. जी मर्यादेत असली तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा सातपट अधिक आहे. तर पीएम १० ची पातळी ९१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर राहिली. शहरात २०१९-२० पासून शहरात १२ टक्के हवेत सुधारणा झाली आहे. असे असले तरी हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी हानीकारक पातळीवर नोंदविली जाते. नवी मुंबईत पीएम १० च्या पातळीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून त्याचे प्रमाण सरासरी १०२ इतके नोंदविले गेले. शहरातील बांधकामे, बंदरातील वाहतुक आणि औद्योगिक उत्सर्जनाने हे राज्यातील सर्वात वेगाने प्रदूषित होणाऱ्या वायु क्षेत्रांपैकी एक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

देशातील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) मुंबई, नागपूर सारख्या शहरात शेकडो कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. परंतु तो अद्यापही खर्च झाला नसल्याचे अहवालात म्हटले. मुंबई शहरात ९३८.५९ कोटी रुपयांच्या निधीमधून ५७४.६४ कोटी निधी वापरला गेला. तर नागपूरमध्ये १४२.०५ कोटी रुपयांच्या निधीमधून निम्म्याहून कमी रक्कम खर्च झाली. एनसीएपी नसलेल्या शहरांना प्रदूषणाचा अधिक धोका असल्याचे अहवालामध्ये नमूद आहे. नागपूरमध्ये पीएम २.५ हे ४७ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आणि पीएम १० ची पातळी ९५ नोंदविली गेली. या दोन्ही पातळ्या राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त आहेत. मालेगाव, परभणी, नगर आणि बेलापूर सारख्या अनेक एनसीएपी नसलेल्या शहरांमध्ये जास्त प्रदूषण आढळले.

वायू प्रदूषण केवळ पर्यावरणाचा मुद्दा नाही. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. अहवालातून स्पष्ट होते की धोरणे अस्तित्त्वात आहेत. परंतु त्यांच्या अमलबजावणीमध्ये विसंगती आढळते आणि अनेकदा ती राबविण्यासाठी विलंब होतो. वार्षिक धोरणाचा अभाव आणि हिवाळ्यापूर्वी, हिवाळ्यात धोरणात्मक उपाययोजना केल्या नाहीत तर राज्यावरील आरोग्य संकट वाढून आर्थिक नुकसान होत राहील. – भगवान केसभट, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, वातावरण फाऊंडेशन.

वायू प्रदूषणाची कमीत कमी पातळी देखील सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. राज्यातील बहुतेक शहरांमध्ये धूलिकणांची पातळी राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकांपेक्षा जास्त आढळली. आपण ज्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आहोत. त्या तुलनेत स्त्रोतावरील उत्सर्जन रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या आहेत, याची आठवण करुन देण्यास ही आकडेवारी पुरेशी आहे. शहरांकडे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या पलीकडे पाहण्यासाठी, अपेक्षित वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उत्सर्जन भार कमी करण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याची आवश्यकता आहे. – सुनील दहिया, संस्थापक, एन्व्हायरोकटॅलिस्ट.