निवडणुका संपताच राज्य सरकारकडून कोटय़वधी रुपयांचा पुरवठा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकांच्या प्रचारात ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कोटय़वधी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या राज्य सरकारने अखेर विकास निधीचे पाट या शहरांसाठी खुले केले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता संपताच ठाण्यासाठी ९२ तर कल्याण-डोंबिवलीसाठी १३७ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येत्या आठवडाभरात हा निधी या दोन्ही महापालिकांकडे सुपूर्द केला जाणार आहे. या शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर केलेल्या विविध प्रकल्पांपैकी आवश्यक प्रकल्पांसाठी हा निधी वापरण्याची मुभा महापालिकांना देण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहरांच्या विकासासाठी कोटय़वधी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ही शहरे स्मार्ट व्हावीत यासाठी जवळपास ६०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प या भागात आखले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. याशिवाय डोंबिवलीलगत कल्याण विकास केंद्राची आखणी करताना मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून त्यासाठी १०२५ कोटी रुपये राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. या घोषणांना वर्ष उलटून गेले तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत राज्य तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून छदामही जमा झाला नाही. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारात शिवसेनेने या मुद्दय़ावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडले. कल्याणचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना जाहीर सभांमध्ये सहभागी करून घेताना शिवसेनेने मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली होती. या पाश्र्वभूमीवर निवडणुका होताच राज्य सरकारने या दोन्ही शहरांना आर्थिक निधी पुरवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.

२२९ कोटींचे निधी साहाय्य

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी निवडलेल्या शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीची निवड झाली नव्हती. मात्र, स्पर्धात्मक पद्धतीने निवडण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात या दोन्ही शहरांचा समावेश स्मार्ट शहरांच्या यादीत करण्यात आला. राज्य सरकारने नुकताच पाच शहरांना या प्रकल्पातून ४२० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय जाहीर केला असून यामध्ये ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या वाटय़ाला २२९ कोटी रुपयांचा निधी आला आहे. यापैकी ठाणे महापालिकेस ९२ कोटी रुपये मिळणार असून १३७ कोटी रुपयांचा निधी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे वर्ग केले जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली.

महत्त्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य

’ ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाची आखणी करताना केंद्र तसेच राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रकल्पांपैकी प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी हा निधी खर्च करता येणार आहे.

’  ठाणे महापालिकेने इस्रायलच्या धर्तीवर शहरात ‘डीजी ठाणे’ प्रकल्प राबविण्यात निर्णय घेतला असून याशिवाय पाण्याच्या वापरावर मीटर पद्धतीचा अवलंब करण्याच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.

’ या दोन प्रकल्पांसाठी हा निधी प्राधान्याने वापरात आणला जाऊ शकतो, अशी माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सुधीर नाकाडी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यासंबंधीची अधिकृत निर्णय आयुक्तांमार्फत घेतला जाईल, असेही नाकाडी यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government release development fund for thane and kalyan
First published on: 16-03-2017 at 04:18 IST