डॉक्टरांच्या हाताला चांगला गुण असेल तर त्या डॉक्टरकडे उपचार घेणारा रुग्ण तात्काळ ठणठणीत होतो. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताला चांगला गुण असल्यामुळे अल्पावधीत अनेक राज्याच्या हिताचे चांगले निर्णय घेतले जात असून राज्याची प्रकृती ठणठणीत केली जात आहे, अशी टोलेबाजी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी येथे केली.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात शरद पवार यांचा सोमवारी दिवसभर दौरा
डोंबिवलीतील ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. अनघा हेरुर यांच्या कल्याण मधील नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन खा. डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. उमा हेरुर, आ. विश्वनाथ भोईर, डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते.लोकांच्या मनातील सरकार राज्यात स्थापन झाले आहे. शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नाची जाण असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल आहे. विविध भागात नागरी हिताची लोकपयोगी कामे सुरू करण्यात आली आहेत. सामान्यातला सामान्य व्यक्ति मुख्यमंत्री झाल्यामुळे प्रत्येकाच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आता झपाट्याने राज्य विकासासाठी काम करत आहेत, असे खा. शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा – ठाणे : गणेशोत्सवानिमित्त बाजारात नागरिकांची खरेदीला गर्दी
दुष्टी चांगली असेल तर आपण लोकांना चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जाऊ शकतो. माणसाची दृष्टी खराब झाली तर त्याचे काय होऊ शकतो हे आताच अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असे सांगत खा शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. हेरुर रुग्णालयातून लोकांना दृष्टी देण्याचे काम केले जाणार आहे. दृष्टी चांगली असेल तर सर्व काही चांगले होते. आणि ती खराब झाली तर काय होते हे दोन महिन्यापूर्वी राज्याने पाहिले, असे बोलताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
हेरुर कुटुंबीयांचा रुग्ण सेवेत मोठा वाटा आहे. त्यांनी आता उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, मुंबईतही रुग्णसेवेचे जाळे विणावे. सामान्यतल्या सामान्य लोकांना रुग्ण सेवा द्यावी, अशी अपेक्षा खा. शिंदे यांनी व्यक्त केली. १९७२ मध्ये डोंबिवलीत लहानशा दवाखान्यापासून ज्येष्ठ डॉ. उमा हेरुर यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली . आता त्यांचा मुलगा, सून या वैद्यकीय सेवेचा वारसा पुढे नेत आहेत.
यावेळी माजी नगरसेवक रवी पाटील, संजय पाटील, सुनील वायले, छाया वाघमारे उपस्थित होते.