बदलापूरः राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगर पालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी आजपासून अर्ज भरता येणार आहे. १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या mahasecelec.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहे. येथेच प्रतिज्ञापत्रही भरता येणार आहे. प्राथमिक नोंदणी करून हा अर्ज भरता येईल. १८ नाव्हेंबर रोजी या सर्व अर्जांची छाननी होणार असून २१ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगर पंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या प्रक्रियेसाठी सोमवारी, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या त्यांच्या पत्रात उमेदवारी अर्ज हा ऑनलाईन माध्यमातून भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबरच्या पत्रकानुसार, ‘या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र सहजरितीने भरता यावे यासाठी महाआयटीच्या मदतीने एक सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. सर्व संभाव्य उमेदवारांनी सॉफ्टवेअरद्वारेच नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. त्यांनी mahasecelec.in या वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये स्वतःची नोंदणी (Register) करुन घ्यावी.
त्यानंतर नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्याची प्रत (प्रिंट) घेवून त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करावे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्षासाठी याच संकेतस्थळावर माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी सर्व माहिती, कागदपत्रे सोबत ठेवण्याची आवश्यकता आहे.
उमेदवारांनो हे लक्षात ठेवा
सोमवार, १० नोव्हेंबरपासून अर्ज भरता येणार आहेत. तर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. तसेच त्याच दिवशी १७ नोव्हेंबपर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हे अर्ज स्विकारले जाणार आहेत. रविवारच्या दिवशी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी सात दिवस असणार आहेत.
छाननी आणि अर्ज मागे घेणे
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
