बदलापूरः एकीकडे रेल्वेच्या निर्णयांचा बदलापुरकर रेल्वे प्रवाशांना फटका बसत असताना दुसरीकडे अपुऱ्या सुविधा, गर्दी, उशिराने धावणाऱ्या लोकल यामुळे बदलापुरकर असुरक्षित प्रवास करत आहेत. असे असताना रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात १० वर्षांपेक्षा जुना स्वयंचतिल जीना लावल्याने आता संताप व्यक्त होतो आहे. खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी याबाबतचा आक्षेप नोंदवल्यानंतर गुरूवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात या जीन्याची पाहणी करत रेल्वे प्रशासनाचे पितळ उघडे केले. याप्रकरणी एमआरव्हीसीच्या कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या विविध सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक निर्णय घेतले. वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेला होम फलाट रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक मध्ये बदलला. त्यानंतर जुना फलाट क्रमांक एकला दोन मध्ये रूपांतरीत करण्यात आले. त्यासाठी येथे जाळी लावण्यात आली. त्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. फलाट क्रमांक दोनवर अतिरिक्त सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती. त्यानंतर फलाट क्रमांक एकवर पादचारी पूल, छप्पर आणि स्वयंचलित जिन्याचे काम सुरू करण्यात आले.
मात्र फलाट क्रमांक एकवर सुमारे दहा वर्ष जुना स्वयंचलित जीना लावला जात असल्याची बाब महाविकास आघाडीने उघडकीस आणली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर गुरूवारी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात स्वयंचलीत जिन्याची पाहणी केली. या पाहणीत हा जीना जुना असल्याचे उघडकीस आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे अविनाश देशमुख यांनी सांगितले.
आम्हाला याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोन महिन्यांपासून हा जीना लावू नका अशी मागणी केली होती. मात्र त्यानंतरही हा जीना येथे लावण्यात आला आहे, अशी माहिती अविनाश देशमुख यांनी दिली. रेल्वे प्रशासन जुन्या वस्तूंचा वापर करत नाही. त्यामुळे एमआरव्हीसी कंत्राटदाराने रेल्वे प्रशासनाची ही फसवणूक केली आहे. ही फक्त रेल्वेची नाही तर बदलापुरातील लाखो प्रवाशांची फसवणूक असून याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी देशमुख यांनी केली.
आधीच फलाट क्रमांक तीनवर असलेला स्वयंचलीत जीना व्यवस्थित चालत नाही. त्यात अशा पद्धतीने जुना जिना लावून बदलापुरकरांच्या भावनांशी आणि जीवाशी खेळ रेल्वे प्रशासन करत आहेत. अशा सडक्या गोष्टी आमच्या माथी मारू नका, असा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील यांनी दिला. रेल्वे प्रशासनाने नव्याने जिना लावावा अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली.