डोंबिवली : मागील काही दिवसांपासून डोंबिवली जवळील ठाकुर्ली, चोळे, पंचायत बावडी, ९० फुटी रस्ता, खंबाळपाडा परिसरात महावितरच्या विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसा, रात्री महावितरणकडून पूर्वसूचना न देता वीज प्रवाह पाच ते सहा तास खंडित होत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त आहेत.
डोंबिवली शहराजवळील नव्याने विकसित झालेल्या ९० फुटी रस्ता, चोळे, ठाकुर्ली, खंबाळपाडा, भोईरवाडी, कचोरे परिसरात नोकरदार, व्यावसायिक वर्ग अधिक संख्येने राहतो. मध्यमवर्गियांची वस्ती म्हणून हा परिसर ओळखला जातो. या भागातील अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन काम करतात. काही जण विदेशातील कार्यालयांचे काम घरातून करतात. वीज पुरवठा खंडित झाली की त्यांची कोंडी होती. कार्यालयीन काम ठप्प झाल्याने त्यांना वरिष्ठांच्या रोषाला सामोर जावे लागते.
शाळा सुरू झाल्यामुळे सकाळच्या वेळेत मुलांची आंघोळीची वेळ झाली की त्या अगोदरच वीज पुरवठा खंडित झालेला असतो. त्यामुळे घरातील विजेवर चालणारा गिझर बंद राहतो. मुले, घरातून कामावर जाणाऱ्यांना भोजन डबा देण्याची गडबड, अशा परिस्थितीत वीज प्रवास बंद असला की घरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते, अशा तक्रारी ठाकुर्ली परिसरातील नागरिकांनी केल्या. उन्हाळ्यात सकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झाला की थंड पाण्यात आंघोळ करता येते. आता हवेत गारवा असल्याने थंड पाणी अंगावर घेणे शक्य होत नाही, असे नागरिकांनी सांगितले.
सततच्या वीज पुरवठ्यामुळे घरातील शीतकपाट, इंटरनेट, दूरचित्रवाणी यंत्रणा बंद राहते. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे या यंत्रणेत बिघाड निर्माण होतो. ठाकुर्ली परिसर हा विकसित भाग असुनही या भागातील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने या भागातील रहिवासी त्रस्त आहेत. या भागातील उद्योजक, विकासकांनीही या वीज बंदचा आम्हालाही फटक बसतो असे सांगितले. .या भागातील वीज पुरवठा सुस्थितीत ठेवण्यासाठी महावितरणचे पुढाकार घ्यावा, अशा मागण्यांचे निवेदन लवकरच या भागातील नागरिकांकडून वरिष्ठांना देण्यात येणार आहे.
महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, यावेळी पाऊस लवकर सुरू झाला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे रखडली. ती कामे पूर्ण केली जात आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीट रस्ते कामे, गटाराची कामे सुरू आहेत. ही कामे करताना खोदकामाच्या वेळी महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्या खराब होतात. काही कामे तात्काळ करणे गरजेचे असते. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे करताना बिघाड होणारी कामे एकाचवेळी करावी लागतात. ही कामे वेळेत केली नाहीतर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती असते. ही कामे आहे त्या वेळेत पूर्ण केली जात आहेत. त्याचा नागरिकांना वीज प्रवाह खंडित होण्याच्या माध्यमातून त्रास होत आहे. वीज पुरवठा अखंडित सुरू राहण्यासाठी नागरिकांनी महावितरणला थोडे सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्याने केले.