ठाणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांचे अधिकार काढून त्यांची चौकशी करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनानंतर आहेर यांच्याकडील स्थावर मालमत्ता विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली असली तरी त्यांचा अतिक्रमण सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार मात्र कायम ठेवण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून आमदार आव्हाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजमाध्यमातून टीका करत इतकी पाठराखण का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी एका गुंडामार्फत कुटुंबियांना संपविण्याची सुपारी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यासंबंधीची एक ध्वनिफीत प्रसारित करत त्यातील संभाषण आहेर यांचेच असल्याचा दावा केला होता. विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा त्यांनी उपस्थित करत याप्रकरणी आहेश यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू झाली आहे. याशिवाय, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी ठाणे पोलिसांनी आहेर यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच आहेर यांच्या पालिकेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे विलास पोतनीस, अनिल परब आणि सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली होती. त्यावर महेश आहेर यांचे अधिकार काढून त्यांची चौकशी करणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत आश्वासन दिले होते. या आश्वासनंतर आहेर यांच्याकडील स्थावर मालमत्ता विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक पदाचा पदभार काढून घेण्याची कारवाई पालिका प्रशासनाने केली असून, त्यांच्याकडे असलेला अतिक्रमण विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार मात्र कायम ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याच मुद्द्यावरून आमदार आव्हाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाजमाध्यमातून टीका करत इतकी पाठराखण का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
आव्हाड यांची टिका
हा तर विधी मंडळाचा आपमान आहे. पत्रात स्पष्ट नमुद आहे की, सर्व पदभार काढून घेण्यात यावे. पण मुखमंत्री सांगतात फक्त एक पदभार काढा. विधी मंडळाच्या कामकाजात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करतात. महाराष्ट्रात हे कधीच घडले नव्हते. अधिकाऱ्यांनी आपले काम केले, पण मुख्यमंत्र्यांनी विभागास वेगळ्या सूचना केल्या, असे विभागाच्या पत्रात नमुद केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर समाजमाध्यमांतून केली आहे. तसेच इतकी पाठ राखण का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.