ठाणे – वागळे इस्टेट भागातील नेहरू नगर परिसरात असलेल्या एका खासगी कंपनीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या आगीत कंपनीच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी वेळेत दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेहरू नगर परिसरातील रोड क्रमांक १६ वरील लोटस पार्क जवळील सेंट्रम बिझनेस स्क्वेअरच्या दुसऱ्या मजल्यावर एका खासगी कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाला सोमवारी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे कंपनीच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी वागळे प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, मुख्य आणि विभागीय अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, वागळे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, ठा.म.पा. विद्युत विभागाचे कर्मचारी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली.
वागळे इस्टेट परिसरात अनेक औद्योगिक आणि व्यावसायिक कार्यालये, कॉल सेंटर तसेच आयटी कंपन्या असल्यामुळे या भागात नेहमी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी उपस्थित असतात. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टळली. तरीसुद्धा या घटनेमुळे स्थानिक उद्योगधंद्यातील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.