ठाणे शहरात आधीच तीन उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. त्यात लवकरच कोपरी पूल रुंदीकरण आणि मेट्रो प्रकल्पाची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीचे हे चक्रव्यूह भेदण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे..

ठाणे शहराच्या विविध भागांत तीन उड्डाण पुलांची तसेच कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या उभारणीची कामे सुरूअसतानाच आता कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे आणि मेट्रो प्रकल्पाची कामे सुरूकरण्यात येणार आहेत. या कामांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक काहीशी संथगतीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता मुंब्रा बाहय़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून या कामासाठी हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक महापे येथून आनंदनगर चेक नाका मार्गे वळविण्यात येणार असल्याने ठाणे, नवी मुंबई आणि मुलुंड या शहरात अभूतपूर्व कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई वाहतूक पोलिसांपुढे ही कोंडी टाळण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हे आव्हान पोलीस कसे पेलतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी भेदण्यासाठी शहराच्या अंतर्गत भागात उड्डाण पूल उभारणीची कामे सुरू आहेत. मीनाताई ठाकरे चौक, अल्मेडा चौक आणि महात्मा गांधी मार्ग अशा तीन ठिकाणी हे उड्डाण पूल उभारण्यात येत आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हे पूल उभारण्यात येत आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेपर्यंत हे पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेने केली आहे. प्रत्यक्षात मात्र या पुलांच्या कामाचा वेग आणि शिल्लक कामे पाहता मे महिन्याच्या अखेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल, असे वाटत नाही. या पुलाच्या कामांमुळे येथील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. तसेच कळवा खाडीवर तिसरा पूल उभारणीचे काम सुरूअसून या कामामुळेही येथील वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. एकीकडे या कामांमुळे शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असतानाच दुसरीकडे कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे आणि मेट्रो प्रकल्पाची कामे लवकरच सुरूकरण्यात येणार आहेत. आधीच वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या कोपरी पुलाच्या भागात आणखी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोपरीचा भार वाढणार..

मुंब्रा बाहय़वळण मार्ग नादुरुस्त झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातील अवजड वाहनांची या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक सुरूअसते. कळवा खाडी पुलाच्या कामामुळे विटावा भागातून ही वाहने ठाणे आणि गुजरातच्या दिशेने वळविली तर या भागात चक्काजाम होऊ शकेल. त्यामुळे ही सर्व वाहने महापे, रबाळे, आनंदनगर चेक नाका मार्गे नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वळविण्यात येणार आहेत. परंतु कोपरी पुलाच्या कामामुळे आधीच कोंडी होण्याची भीती व्यक्त होत असतानाच आता मुंब्रा बाहय़ वळण मार्गावरील अवजड वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबत अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता आहे. ठाण्याप्रमाणेच नवी मुंबई आणि मुंबई या शहरांनाही या कोंडीचा फटका बसणार आहे.

असा भार कमी होऊ शकतो..

ठाणे शहरातील तीन उड्डाण पूल, कळवा खाडी पूल, कोपरी पूल रुंदीकरण, मेट्रो प्रकल्प आणि मुंब्रा बाहय़वळण मार्ग या कामांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सविस्तर अभ्यास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंब्रा बाहय़वळण मार्गावरून सम-विषम पद्घतीने वाहतूक सुरू करून चाचपणी करण्यात येत आहे. असे असले तरी जेएनपीटी बंदरातील अवजड वाहतुकीचा भार कमी केला तरच ही कोंडी सोडविणे शक्य होणार आहे. जुना पुणे मार्ग किंवा एक्स्प्रेस-वे मार्ग – चाकण- नाशिक – धुळे किंवा नंदुरबार मार्गे गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे. या मार्गे जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक वळविली तर ठाणे शहरावर येणाऱ्या अवजड वाहतुकीचा भार मोठय़ा प्रमाणात कमी होईल आणि संभाव्य कोंडीतून ठाणेकरांची सुटका होऊ शकेल. त्यामुळे नियोजन करताना वाहतूक पोलिसांनी या बाबीचाही विचार करणे गरजेचे आहे.

नीलेश पानमंद nilesh.panmand@expressindia.com