घोडबंदर रोड : मार्गावरील फाऊंटन हाॅटेल भागात वाहनांचा भार वाढल्याने विरुद्ध दिशेने झालेली वाहतुक तसेच रस्त्याची वाईट अवस्था यामुळे शुक्रवारी सकाळी घोडबंदर मार्गावर फाऊंटन हाॅटेल ते कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतुक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले असून अनेकांना वेळेत कार्यालय गाठणे शक्य झाले नाही. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथील कोंडी केव्हा सुटणार असा प्रश्न प्रवासी आणि वाहन चालक करत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण जेएनपीटी, भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. याच मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर ते कासारवडवली) आणि चार अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसविण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो. गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडीचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागतो.
त्यातच शुक्रवारी पहाटे पासून अवजड वाहनांचा भार वाढल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. फाऊंटन हाॅटेल ते कासारवडवली पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. घोडबंदर मार्गावर सकाळी नोकरदार वाहन चालकांच्या वाहनांचा भार अधिक असतो. वाहतुक कोंडीमुळे चालकांचे हाल झाले अवघ्या १० ते १५ मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तासाहून अधिक काळ वाहतुक कोंडीत अडकून राहावे लागले. सकाळी ८ नंतरही वाहतुक कोंडी कायम होती. सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरादांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. त्यामुळे अनेक वाहन चालक संताप व्यक्त करत होते.
पोलिसांचे म्हणणे काय?
याबाबत ठाणे वाहतुक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला विचारले असता, मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय क्षेत्रातील काशीमिरा हद्दीमध्ये ही वाहतुक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम ठाण्यातील वाहतुक व्यवस्थेवर झाला. तेथील अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच घोडबंदर मार्गावर झालेली वाहतुक कोंडी सुरळीत करण्याचे काम वाहतुक विभागाकडून सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.