ठाणे : गुगल जाहिरातीच्या माध्यमातून जादा परतावा देतो अशी बतावणी करून १२४ गुंतवणूकदारांची ९१ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पराग शहा याला बुधवारी ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

क्यू फोन ॲप कंपनीद्वारे गुगलसाठी अनेक ॲप बनविल्या जात असून त्यावरील जाहीरातीमुळे गुगलकडून डाॅलरच्या रुपात परतावा मिळतो अशी बतावणी करत शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती. अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. हा प्रकार २०२० ते २०२४ या कालावधी पर्यंत सुरु होता. परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पराग शहा याच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणाचा समांतर तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. या प्रकरणात आतापर्यंत ९१ कोटी ६३ लाख ७१ हजार ४७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. दरम्यान पराग शहा हा पुण्यातील नारायणगाव येथे असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ११ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात शेकडो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असल्याचे तपासात आढळून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संख्येत आणि फसवणूक झालेल्या रकमेत वाढ होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.