ठाणे : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ललीत शक्ती (२४) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. तरूणांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो स्वत: रेल्वेमधील कर्मचारी असल्याचे भासवित होता. तसेच त्याने रेल्वे मंत्रालयाच्या नावाने बनावट अर्ज, नियुक्तीपत्र देखील तयार केली होती. फसवणूक झालेले १४ तरुण पुढे आले असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

ठाण्यात राहणाऱ्या एका तरूणाची रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक झाली होती. त्याने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट एककडून सुरू होता. दरम्यान, आणखी एका तरूणाची तो व्यक्ती फसवणूक करणार असल्याची माहिती युनीट एकला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे, उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे भारतीय रेल्वेचे बनावट ओळखपत्र, कागदपत्र आढळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव ललीत शक्ती असल्याचे सांगितले. ललीत हा उल्हासनगर येथे वास्तव्य करतो. याप्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या तरूणांची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> अवजड वाहनांमुळे दिवसा शिळफाटा वाहतूक कोंडीत, अवजड वाहतुकीच्या वेळेच्या नियमावलीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी होती कार्यपद्धत

ललीत शक्ती याने फेसबुक या समाजमाध्यमावर खाती तयार केली होती. त्यामध्ये विविध बनावट नावांचा वापर करून रेल्वे भरती आहे, अशा जाहिराती तयार केल्या. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार जाहिरात पाहून त्याला मोबाईलद्वारे संपर्क साधत. त्या तरूणांना तो रेल्वेमध्ये असल्याचे सांगून त्यांच्याकडून नोकरीसाठी एक ते अडीच लाख रुपयांपर्यंत पैसे मागत होता. तरूणांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने भारतीय रेल्वे विभागाच्या नावाने काही बनावट अर्ज तयार केले होते. तसेच रेल्वे मंत्रालयाच्या नावाने बनावट नियुक्ती पत्र तयार केली होती. नियुक्ती पत्र देण्यासाठी तो तरूणांना त्यांच्या भागातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात बोलवित होता. तरूणाने पैसे दिल्यानंतर त्यांना तो बनावट नियुक्ती पत्र देत असे. पैसे मिळाल्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक बदलत होता.