डोंबिवली : डोंबिवलीतील एका सराफाच्या दुकानात एक इसम आला. आपल्या पत्नीचा वाढदिवस आहे. तिला भारदस्त सोन्याचा कंठीहार भेट द्यायचा आहे. असे सराफ दुकानातील महिला कर्मचाऱ्याला सांगितले. सराफ दुकानातून सोन्याचा हार खरेदी केल्यानंतर त्या हाराच्या किमती एवढी जवळील सोन्याची बनावट नाणी दुकानातील महिला कर्मचाऱ्याच्या स्वाधीन केली. हा व्यवहार पूर्ण झाल्या नंतर भामटा तेथून निघून गेला. त्यानंंतर ही सोन्याची नाणी पारख करणाऱ्या जवाहिऱ्याकडे तपासण्यात आली. ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
अशाप्रकारे भामट्याने सराफ दुकानातील महिला कर्मचाऱ्याची आणि सराफाची १० लाख ३३ हजार रूपयांची बनावट सोन्याच्या नाण्याच्या माध्यमातून फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी महिला कर्मचाऱ्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.पूजा विनायक दळवी असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या डोंंबिवली पश्चिमेत रेतीबंदर रस्ता भागात राहतात. पूजा दळवी या डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील सुयोग हाॅलजवळील राखी इमारतीमधील तळमजल्यावरील गाळ्यातील श्री देवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या सराफाच्या दुकानात नोकरीला आहेत.
पूजा दळवी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपण श्री देवी ज्वेलर्समध्ये नोकरीला आहोत. या दुकानात शुक्रवारी (ता. २९) दुपारी दीड वाजताच्या दरम्यान एक अनोळखी इसम घाईघाईत आला. त्याने आज आपल्या पत्नीचा वाढदिवस आहे. तिला भेट म्हणून मला भारदस्त असा सोन्याचा कंठीहार भेट द्यावयाचा आहे. तेव्हा चांगल्या दर्जाचा गुणवत्तापूर्ण असा सोन्याचा हार खरेदी करायचा आहे. आपल्याकडे सोन्याची नाणी आहेत. जेवढ्या किमतीचा हार आहे. तेवढ्या किमतीची सोन्याची नाणी आपण देऊ असे महिला कर्मचाऱ्याला सांगितले.
दुकानात आलेला इसम हा भामटा आहे. हे त्याच्या बोलण्यावरून कोणाही कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले नाही. दुपारी दीडच्या सुमारास दुकानातील मालक, इतर कर्मचारी भोजनासाठी दुकानाच्या पाठीमागील बाजुस बसलेले असतात. किंवा मालक घरी भोजनासाठी गेलेलो असतो. याची पूर्ण जाणीव या भामट्यांना असते. हा अभ्यास असल्याने इसम श्री देवी ज्वेलर्समध्ये दुपारच्या वेळेत आला होता.
त्याने दुकानातील विविध प्रकारचे सोन्याचे हार पारखले. त्यापैकी त्याने एक सोन्याचा हार पसंत केला. आणि त्या सोन्याच्या हाराच्या रकमेएवढी जवळील सोन्याची नाणी सराफ दुकानात जमा केली. हार ताब्यात घेतल्यानंतर इसम ज्वेलर्स दुकानातून निघून गेला. सोन्याची नाणी पारखून घ्यावी म्हणून सराफाने ती पारखणाऱ्या तज्ज्ञ ज्वेलर्सकडून तपासली. ती नाणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दुकानातून सोन्याचा हार खरेदी करून त्या बदल्यात बनावट सोन्याची नाणी दुकानात भरणा केली.या भामट्याने फसवणूक केल्याने पूजा दळवी या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मागील दोन वर्षापासून दुपारच्या वेळेत दोन ते तीन महिला सामान्यपणे, काही बुरखा घालून दुकानात सोने खरेदीसाठी येतात. सराफाकडे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने पाहण्यासाठी मागतात. दुकानदार दुकानात आत बाहेर करत असताना काही दागिने हातचलाखी करून लांबवित असल्याचे अनेक प्रकार दोन वर्षात कल्याण, डोंबिवलीत घडले आहेत.