वीजबिल कमी करण्याचे आमिष दाखवून वीज ग्राहकांकडून रोख रक्कम घेऊन ती स्वताकडे ठेवायचा. स्वतःच्या रक्कम शिल्लक नसलेल्या बँक खात्याचा धनादेश महावितरणकडे जमा करायचा आणि महावितरण व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. ए. आर. शेख यांनी एक वर्ष तुरुंगवास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

साहिल असगर पटेल (रा. बिस्मिल्ला हॉटेलजवळ, मौलबी चौक, गोविंदवाडी, कल्याण पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एकूण २३ ग्राहकांकडून वीज देयक भरण्यासाठी रक्कम घेतली होती. अशाप्रकारे त्याने ग्राहक व महावितरणची दोन लाख ४० हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.

कल्याण पश्चिम विभाग अंतर्गत विविध चार बिल भरणा केंद्रात येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचा बहाणा करून साहिलने या ग्राहकांकडून रोख रक्कम घेतली. ही रक्कम हडप करून आरोपीने संबंधित ग्राहकांच्या वीज बिलापोटी स्वतःच्या व रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा धनादेश बिल भरणा केंद्रात जमा करून ग्राहकांना त्याची पावती दिली. हे धनादेश न वटल्याने कल्याण पश्चिम विभाग कार्यालयात परत आले आणि आरोपीचे कारस्थान उघडकीस आले. न वटलेल्या धनादेश आणि ते जमा करणाऱ्या ग्राहकाची चौकशी करण्यात आली. त्यात साहिलने वीज देयक भरण्यात बनावट प्रकार केले असल्याचे उघड झाले. त्यानुसार वित्त व लेखा विभागाचे उप व्यवस्थापक गजानन राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून महात्मा फुले चौक पोलिसांनी मार्च २०२१ मध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. ए. आर. शेख यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरिक्षक डी. एन. ढोले आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भादविच्या कलम ४२० नुसार एक वर्ष कारावास व एक हजार रुपयांचा दंड आणि कलम ४०६ नुसार सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणीही वीज ग्राहकाने वीज देयक कमी करण्यासाठी अनोळखी व्यक्तिकडे पैसे देऊ नये किंवा माहितीची विचारणा करू नये. ग्राहकांनी आपल्या वीज देयकासंदर्भातील तक्रारी, शंका निरसन करण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण अधिकाऱ्यांनी केले आहे.