माणकोली पूल निवडणुकीपूर्वी खुला?

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत विकासकामांचा धडाका लावत शिवसेनेने येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठागाव खाडीवरील माणकोली पूल खुला करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

डोंबिवलीतील मोठागाव खाडीवर माणकोली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पूल सुरू करण्याच्या हालचाली

भगवान मंडलिक

कल्याण : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत विकासकामांचा धडाका लावत शिवसेनेने येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठागाव खाडीवरील माणकोली पूल खुला करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे-डोंबिवली यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या पुलामुळे कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन या पुलाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत असे स्पष्ट आदेश मुंबई महानगर विकास प्राधिकरणास देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.   

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. याच मतदारसंघाचा भाग असलेल्या कळवा-मुंब्रा तसेच दिवा या ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या परिसरातही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे खासदार शिंदे यांच्यासाठी या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद बरीच मोठी आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मात्र शिवसेनेपुढे यंदा भाजपचे तोडीस तोड आव्हान आहे. डोंबिवली आणि कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर कल्याण ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्र नवनिमाण सेनेचे राजू पाटील निवडून आले आहेत. हे लक्षात घेता शिवसेनेने ही निवडणूक आतापासूनच गांभीर्याने घेतली असून वेगवेगळय़ा विकासकामांच्या माध्यमातून पक्षासाठी पोषक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

‘मिशन माणकोली’

कल्याण, डोंबिवलीतील महत्त्वाचे पूल सुरू करून शिवसेनेने शहरवासीयांना खूश करण्याचा धडाका लावला असताना येत्या काळात माणकोली उड्डाणपुलावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डोंबिवलीकरांची शिळफाटा, कोन-भिवंडी येथील वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी माणकोली उड्डाणपूल लवकरच खुला होणे आवश्यक आहे. येत्या मार्च-एप्रिल दरम्यान कल्याण-डोंबिवली पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी माणकोली पूल खुला करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या आणि एमएमआरडीएकडून सुरू झाले आहेत. महापालिका निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी कोपर, पत्रीपुलाबरोबर माणकोली पूल ठेवता येईल, अशी व्यूहरचना सेनेकडून आखली जात आहे. ‘एमएमआरडीए’चे नियंत्रक, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आहेत. या आयुधाचा पुरेपूर वापर करून सेनेने माणकोली पूल येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल यादृष्टीने प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना नगरविकास विभागाने कामाला लावले असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. याप्रकरणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत संपर्क करून, लघुसंदेश पाठवूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. खासदार डॉ. शिंदे यांनी मोठागाव पुलाची सविस्तर माहिती घेऊन बोलतो. आपण बाहेरगावी आहोत, असे सांगितले.

पुलामुळे होणारे फायदे

  • डोंबिवली परिसरातील नागरिक माणकोली पुलावरून २५ मिनिटांत ठाणे, ५० मिनिटांत मुंबईत पोहचणार आहे.
  • डोंबिवलीतील नोकरदारांची शिळफाटा, कोन, दुर्गाडी येथील कोंडीतून कायमची मुक्तता होणार.
  • डोंबिवलीतून माणकोली पुलावरून थेट मुंबई-नाशिक महामार्गावर जाता येईल.
  • शहापूर, नाशिक दिशेने जाण्यासाठी यापुढे कल्याण, पडघा, कोन येथून जाण्याची आवश्यकता नाही.
  • माणकोली पुलावरून ठाणे, मुंबईकडून येणारी वाहने मोठागाव येथील वळण रस्त्याने टिटवाळा, शिळफाटाकडे जाऊ शकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mankoli bridge elections ysh

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार