ठाणे : घोडबंदर येथील ब्रम्हांड भागात वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मजूर आणि वृक्ष तोडीची परवानगी देणाऱ्या एकूण १० जणांविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिन्याभरापूर्वी याच ठिकाणी अनेक वृक्ष तोडण्यात आले होते. पुन्हा याच भागात वृक्षांची कत्तल सुरु होती.

बूच, ताम्हण, मोह, देशी बदाम, करंज, सप्तपर्णी, खाया, बकुळ यासह काही महत्त्वाच्या प्रजातींचे वृक्ष तोडण्यात आले आहेत. ब्रम्हांड येथील पोलीस चौकीच्या मागील बाजूस वृक्ष तोड होत असल्याची माहिती एका नागरिकाने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना दिली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, पालघर भागातून आलेले पाच जण येथे वृक्ष तोड करत असल्याचे आढळून आले. त्यांना काही व्यक्तींनी वृक्ष तोडण्याचे काम दिले होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांना संपर्क साधून महापालिकेची परवानगी आहे का अशी विचारणा केली असता. त्यांनी परवानगी नसल्याची माहिती दिली.

यापूर्वी देखील वृक्षतोड

ऑगस्ट महिन्यामध्ये देखील याच ठिकाणी अवैधरित्या मोठ्याप्रमाणात वृक्ष तोडण्यात आले होते. त्यावेळी देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी तेथे पाहणी केली होती. पुन्हा वृक्ष तोड झाल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरंक्षण व जतन अधिनियम, १९७५ चे कलम २१(१),२१(२), ८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.