दफन करण्यासाठी महापालिकेकडे जागाच नाही; १० मृतदेह शवागारातच
शवागारात आलेल्या बेवारस मृतदेहांचा १५ दिवसांत ताबा घेण्यात आला नाही तर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असा नियम आहे. परंतु असा ताबा न घेतलेले बेवारस मृतदेह दफन करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्यामुळे १० बेवारस मृतदेह गेल्या तीन महिन्यांपासून महानगरपालिकेच्या शवागारात अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत पडून राहिले आहेत.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील शवविच्छेदन केंद्रामध्ये असलेल्या शवागृहात २१ मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. रेल्वे अथवा रस्ते अपघातांतील मृतदेह अथवा गुन्ह्य़ांमध्ये सापडलेले मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी भाईंदर पश्चिम येथील शवविच्छेदन केंद्रात येत असतात. मृतांचे नातेवाईक ओळख पटवून मृतदेहांचा ताबा घेत नाहीत तोपर्यंत शवविच्छेदन केलेले मृतदेह शवागारात ठेवले जातात. अनेक वेळा बेवारस मृतदेहांचा ताबा घेण्यासाठी कोणी आले नाही तर ते शवागारात पडून राहतात. मृतदेहावर १५ दिवसांत कोणी दावा केला नाही तर स्थानिक पोलिसांशी सल्लामसलत करून त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असा शासनाचा नियम आहे. शिवाय बेवारस मृतदेहांच्या बाबतीत भविष्यात कोणतेही कायदेशीर पेचप्रसंग उद्भवू शकतात, यासाठी बेवारस मृतदेह दहन न करता त्यांचे दफनच करणे बंधनकारक आहे, जेणेकरून आवश्यकता वाटल्यास हे मृतदेह अथवा त्याचे अवशेष तपासणीसाठी पुन्हा बाहेर काढता येणे शक्य होते.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या शवागारातल्या शीतपेटय़ांमध्ये १० बेवारस मृतदेह गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहेत. या मृतदेहांचा ताबा घेण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. नियमानुसार १५ दिवसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार व्हायला हवे होते; परंतु हे मृतदेह दफन करण्यासाठी महानगरपालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्याने मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची, असा पेचप्रसंग उभा राहिला आहे.
दफनभूमीच्या जागेवर लाकडे
बेवारस मृतदेहांचे दफन यापूर्वी भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत केले जायचे. यासाठी स्मशानगृहाच्या आवारातच स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आली आहे; परंतु या स्मशानभूमीचे गेल्या काही महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या कामात स्मशानातील लाकडे ठेवण्याची खोली तोडण्यात आली असल्याने अंत्यसंस्कारांसाठी लागणारी लाकडे दफनभूमीच्या जागेवरच ठेवण्यात आली आहेत. आधीच दफनविधीसाठी या ठिकाणी असलेली जागा अत्यंत अपुरी आहे. अनेक वेळा एका मृतदेहावर दुसरा मृतदेह दफन करण्याची वेळ येत असते. अशा परिस्थितीत दफनभूमीची सर्व जागा लाकडांनी व्यापली आहे. त्यातच स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे कामही अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे बेवारस मृतदेहांचे दफन करायचे कुठे, पेचप्रसंग महापालिका आणि पोलीस प्रशासन अशा दोघांपुढेही उभा ठाकला आहे. परिणामी शवागारातील दहा मृतदेह मात्र अंत्यसंस्कारांची वाट पाहत तीन महिन्यांपासून ताटकळत शवागारातील शीतपेटय़ांमध्ये पडून राहिली आहेत.