ठाणे : मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत असतानाच त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरल्याचे समोर आले आहे. या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १०९ रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणीकरीता मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे पाठविण्यात आले असून त्यापैकी ३७ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामुळे पालिकेचे डोकेदुखी वाढली असून त्यांनी ही साथ रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई शहरात गेल्या काही दिवसात गोवर आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. असे असतानाच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरल्याचे समोर आले आहे. ३७ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी ही साथ रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.रुग्ण बाधीत कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण सुरू केले आहे. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन ए चा पहिला डोस व २४ तासानंतर दूसरा डोस देण्यात आले. तसेच ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील ज्या लाभार्थ्यांनी गोवर रुबेलाचा डोस घेतलेला नाही, अशा लाभार्थ्यांना गोवर रुबेला डोस दिला जात आहे.

हेही वाचा: मुंबईला गोवरची चिंता; सात संशयितांचा मृत्यू, २० हजार बालके लसवंचित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोवर बाधीत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नाही, असे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहे. गोवर रुबेला आजाराचे वाढते रुग्ण लक्षात घेता नियंत्रण, उपाययोजना व विचार विनिमय करण्याकरीता खाजगी बालरोग तज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षक, तसेच धर्मगुरु मौलाना) यांची बैठक घेण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.