कल्याण – भारताची पाकिस्तान विरुध्द ऑपरेशन सिंदूर ही लष्करी मोहीम सुरू असताना तुर्कस्तान, अझरबैझान, चीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी इंडियन रेडिऑलाॅजिकल ॲन्ड इमॅजिंग असोसिएशनच्या (इरीआ) महाराष्ट्र राज्य विभागाने आपल्या सर्व सदस्यांना तुर्कस्तान, अझरबैझान, चीनच्या पर्यटनावर आणि तेथील वस्तू वापरावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

कल्याणमधील ज्येष्ठ डाॅ. प्रशांत पाटील इंडियन रेडिऑलाॅजिकल ॲन्ड इमॅजिंग असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य विभागाचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष डाॅ. पाटील, सचिव डाॅ. सुशांत भदाने आणि कोषाध्यक्ष डाॅ. संदीप महाजन यांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्यातील आपल्या वैद्यकीय संघटनेतील सर्व सदस्यांना पत्र पाठवून तुर्कस्तान, चीन आणि अझरबैझान येथील पर्यटनावर आणि तेथील वस्तू वापरावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर ही लष्करी मोहीम हाती घेतली होती. भारताच्या दहशतवादा विरोधातील या मोहिमेत जगातील अनेक राष्ट्रांनी भारताला भक्कम पाठिंबा दिला. अशा परिस्थितीत या मोहिमेच्या वेळी तुर्कस्तान, अझरबैझान आणि चीन देशांनी उघडपणे पाकिस्तान समर्थनाची भूमिका घेऊन भारता विरुध्द उघड भूमिका घेतली आणि दहशतवादाचे समर्थन केले.

अझरबैझान, तुर्कस्तान या देशांची अर्थव्यवस्था भारतीय पर्यटनावर अवलंबून आहे. हे माहिती असुनही या दोन्ही देशांनी भारता विरुध्द भूमिका घेतली. त्यामुळे या देशांना धडा शिकविण्यासाठी देशातील अनेक संस्था, व्यापारी, व्यावसायिक, कंपन्या यांनी आपल्या माध्यमातून बहिष्कार, बंदीची मोहीम सुरू केली आहे. भारत सरकारने तुर्कस्तान, अझरबैझान देशातील व्यवहारांवर बंदी आणली आहे. अनेक व्यवहार, करार रद्द केले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून इंडियन रेडिऑलाॅजिकल ॲन्ड इमॅजिंग असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य विभागानेही महाराष्ट्रातील आपल्या सर्व सदस्यांना तुर्कस्तान, अझरबैझान आणि चीन देशातील पर्यटनावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑपरेशन सिंदूर या भारतीय लष्करी मोहिमेच्यावेळी सर्व जग दहशतवादा विरुध्द भारताच्या पाठीशी ठाम उभे होते. अशा परिस्थितीत या तिन्ही देशांनी भारता विरुध्द आणि दहशतवादाचे समर्थन करणारी भूमिका घेतली. त्याचा देशभरातून विविध माध्यमातून निषेध होतच आहे. याच निषेधाचा एक भाग म्हणून आमच्या संघटनेने हे पाऊल उचलले आहे. डाॅ. प्रशांत पाटील- अध्यक्ष, इरीआ, महाराष्ट्र विभाग.