social media: ठाणे – गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. गणपतीचे आगमन म्हणजे प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. यासाठी गणपतीच्या आगमनाची तयारी प्रत्येक व्यक्ती हा आवडीने करत असतो. गणपतीच्या आगमनाच्या महिनाभर आधीपासूनच समाजमाध्यमावर देखील गणेशोत्सवाची चर्चा रंगल्याचे दिसत आहे. रील तसेच मीम्स च्या माध्यमातून गणपती येत आहेत अशी चाहूल नेटकरी मंडळी देत आहेत. त्यासंदर्भातील अनेक हलक्या फुलक्या शब्दात लिहिलेले हे मीम्स चांगलेच व्हायरल होऊ लागले आहेत. या मीम्सची सर्वत्र चर्चा असून अनेकजण हे मीम्स स्वत:च्या अकाऊंटला शेअर करत आहेत.
गेले काही वर्षांपासून समाजमाध्यमांवर मीम्स (Memes) हा प्रकार प्रचंड व्हायरल होत आहे. ‘मिम्स’ म्हणजे मनोरंजनात्मक, उपरोधिक (satirical) किंवा विनोदी स्वरूपात बनवलेले मजकूर, चित्र किंवा व्हिडीओ, जे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरतात. अगदी कमी आणि हलक्या फुलक्या शब्दात लिहिलेले अर्थपूर्ण असे मीम्स असतात. घडत असलेल्या घडामोडी, राजकीय घडामोडी, सण-उत्सव अशा विविध विषयांवर हे मीम्स लिहिले जातात. समाज माध्यमांवर हे मीम्स तयार करणारे बरेच ग्रुप ॲक्टिव्ह आहेत. काही वर्षांपूर्वी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरुन देखील मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या काही दिवसात समाजमाध्यमावर विशेषकरुन इन्सटाग्रामवर हे मीम्सचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे.
आता, गणेशोत्सवाला अवघे एक ते दोन दिवस शिल्लक राहिले आहे. गणेशोत्सव म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकणात हा उत्सव घरोघरी साजरा होणारा आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात राहणारे अनेक कोकणवासी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात रवाना होतात. यंदाही मोठ्यासंख्येने कोकणवासी कोकणात गेले आहेत.





इन्सटाग्राम (instagram) ॲपवर कोकण वाईब (kokan vibe), कोकणी मुलगा, (kokani mulga) अशा विविध नावांनी ग्रुप सुरु आहेत. या ग्रुपवर गेले महिन्याभरापासून गणेशोत्सवा संदर्भातील मीम्स तयार केले जात आहेत. त्यात, ‘27th August will be all about देवाचा देव माझे घरी आयला हो’, ‘हे सुखाचे अकरा दिवस येणाऱ्या पुढच्या अकरा महिन्यांसाठी जगण्याती ऊर्जा देऊन जातात’, ‘Decoration फक्त बघायला या जर चुका काढलात तर, चिंगम वाला मोदक पण मिळणार नाही’, ‘Life from 27th August दुर्वा फुलं काढायची, पूजा आरती करायची नैवेद्य मोदक खायच, Repeat’, ‘Can’t Wait to witness डोक्यावर पाट आणि त्यावर बाप्पा विराजमान’, ‘27th August ची सकाळ म्हणजे, अवघ्या संसाराचं स्वर्ग पृथ्वीवर अवतरणार कारण माझा लाडक्या बाप्पाच घरी आगमन होणार…’ असे विविध स्वरुपातले मीम्स सध्या समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.