ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी जंक्शन भागात मेट्रो स्थानकाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. परंतु या कामामध्ये कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा सुरु असल्याचे समोर येत आहे. मेट्रो कामादरम्यान एका कार चालकाच्या बोनटवर भला मोठा लोखंडी राॅड पडला. अवघ्या काही इंच अंतर पुढे हा कार चालक असता तर ही घटना त्या कार चालकाच्या जीवावर बेतली असती. यापूर्वीही असाच प्रकार या भागात उघड झाला होता. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर कार चालक आणि त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामाचा महत्त्वाचा टप्पा कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ सुरू आहे. या ठिकाणी स्थानक उभारले जात आहे. परंतु या कामादरम्यान निष्काळजीपणा सुरु असल्याचे दिसून येते. बुधवारी दुपारी घोडबंदर येथील कासारवडवली भागात राहणारा तरुण ऐरोली येथे त्याच्या कामाच्या ठिकाणी जात होता. तो त्याच्या कारने कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात आला असता, एक भला मोठा राॅड काही फूटवरून त्यांच्या कारवर पडला. हा अपघात इतका मोठा होता की, त्यांच्या कारला मोठे नुकसान झाले.

घटनेनंतर कार चालक आणि त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. कार आणखी काही इंच पुढे असती तर हे जीववर बेतले असते. इतकी मोठी घटना झाल्यानंतरही घटनेबाबतची विचारणा करण्यासाठी कंत्राटदार किंवा प्रशासनाचे कोणीही पुढे आले नाही. येथे कोणतीही सुरक्षा साधणे नसल्याची माहिती कार चालकाने ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.

कार चालकाच्या नातेवाईकांनी सांगितले की, एक तासाने येथील अधिकारी घटनास्थळी आले. येथे कोणत्याही सुरक्षा साधणांचा वापर होताना दिसत नाही. कारचे झालेले नुकसान भरून देण्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी ही घटना जीवावर बेतली असती. या प्रकाराची आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देऊ. तसेच असे अपघात पुन्हा घडू नये यासाठी न्यायालयात जावे लागले तर तेथेही जाण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले.

यापूर्वीदेखील दुर्घटना

– २ मे यादिवशीदेखील याच भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर मेट्रो मार्गिकेच्या निर्माण कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग एका कारच्या मागील भागावर पडला होता. या घटनेतदेखील कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. काही अंतर ही कार मागे असती तर ही घटना त्या कार चालक आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवावर बेतली असती.