ठाणे : ठाणे येथील वर्तकनगर, शिवाईनगर तसेच महाराष्ट्रनगर भागातील म्हाडावासियांना तब्बल २० वर्षानंतर पाणी देयकासोबत लाखो रुपयांच्या दंडाच्या नोटीसा म्हाडा प्रशासनाने बजावल्या आहेत. देयकासह दंडाची रक्कम भरली नाहीतर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून या कारवाईच्या भितीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या म्हाडावासियांच्या मदतीसाठी सत्ताधारी पक्षाचे नेते पुढे सरसावले आहेत.
ठाणे येथील शिवाईनगर, वर्तकनगर, महाराष्ट्रनगर या परिसरात म्हाडाच्या ४० ते ५० वर्षे जुन्या बैठ्या वसाहती आणि इमारती आहेत. या ठिकाणी म्हाडामार्फत पाणीपुरवठा करण्यात येत होता. सुरुवातीला या वसाहती आणि इमारतींना नियमितपणे पाणीपट्टीची देयके देण्यात येत होत्या. मागील दोन दशकांपासून त्यांना देयके आणि नोटीसाही प्रशासनाकडून पाठवण्यात आल्या नव्हत्या. आता तब्बल २० वर्षांनी म्हाडाने अचानक या वसाहती आणि इमारतींना पाणीपट्टी थकल्याच्या नोटीसा बजावून १५ दिवसांत देयकाची रक्कम आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितले आहे. तसेच अन्यथा कारवाई करण्याचा इशारा येईल, असा इशारा नोटीसींच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
शिवाईनगर भागात काही वसाहती आणि इमारतींना एक ते सव्वा लाखांची पाणीपट्टी आणि त्यावर १० ते १५ लाखांचा दंड भरण्याच्या नोटीसा मिळाल्या आहेत. वर्तकनगर भागात काही वसाहतींना दोन ते तीन लाखांची पाणीपट्टी आणि त्यावर १० ते १५ लाखांचा दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रनगरमध्ये आहे.
या नोटीसांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून या नागरिकांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांची नुकतीच भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी केळकर यांनी तत्काळ कोकण म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेवती गायकर यांना फोन करून याबाबत जाब विचारला. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असून तूर्त कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
म्हाडा वसाहतीत शेकडो मध्यमवर्गीय कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यांना अचानक लाखो रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमा भरण्याच्या नोटीसा आल्या आहेत. एवढ्या वर्षांनी प्रशासनाला जाग आली का? असा प्रश्न विचरात या अन्यायकारक नोटीसांबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत कारवाई करू नका, अशी मागणी केली आहे. संजय केळकर, आमदार, ठाणे शहर
अचानक आलेल्या नोटीसांनी म्हाडा वसाहतीतील सर्वसामान्य कुटुंबे हतबल झाली आहेत. मात्र आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाकडे मध्यस्थी केली आहे. तसेच केळकर लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सिताराम राणे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन