शेतकरी संपाला दूध व्यावसायिकांचा पाठिंबा

शेतकऱ्यांचा संप आणखी काही दिवस कायम राहिल्यास ठाण्यातील दूध व्यावसायिकदेखील त्यात सहभागी होतील, असा इशारा ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने दिला आहे. दुधाचा साठा करून ग्राहकांना मूळ किमतीपेक्षा जास्त दरात दूध विकणाऱ्या दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत अशा विक्रेत्यांचा दूधपुरवठा बंद करण्यात येईल, असे संघटनेने म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी संपाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेतल्यावर दुधाचा पुरवठा कमी पडेल अशी भीती असलेल्या नागरिकांनी गुरुवारी ठाणे शहरात अतिरिक्त दुधाची खरेदी केली. ठाणे शहरात दररोज दोन ते अडीच लाख लिटरच्या दुधाची आवक होत असते. मात्र सध्याची संपाची परिस्थिती पाहता दूधपुरवठा आणखी काही दिवस बंद राहिल्यास घरात दुधाचा साठा करण्याच्या उद्देशाने गुरुवारी ठाण्यातील नागरिकांनी जास्त दुधाची खरेदी केली. यामुळे ठाणे शहरातील दूध बाजारात नेहमीपेक्षा तीस ते चाळीस टक्के दुधाचा तुटवडा जाणवला होता.  या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या दूध विक्रेत्यांनी मूळ किमतीपेक्षा जास्त दरात दुधाची विक्री केल्यास अशा दूध विक्रेत्यांना संस्थेतर्फे होणारा दूधपुरवठा कायमचा बंद करून कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे उपसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी आणखी दोन दिवस संप कायम ठेवल्यास त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थादेखील दूधपुरवठा बंद करून संपावर जाणार असल्याचे या संस्थेतर्फे सांगण्यात आले.

या संस्थेच्या अंतर्गत ठाणे शहरात ६०० दूधविक्रेते दुधाची विक्री करतात. शहरात दूध विक्रेत्यांनी मूळ किमतीपेक्षा जास्त दरात दुधाची विक्री केल्यास ग्राहकांनी संस्थेकडे कळवल्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. दूध विक्रेत्यांविषयी तक्रार करण्यासाठी फकीरसेन वायकर ९९६९२६०७१२ आणि अमर दळवी ७७३८४४४१२७ या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.