गेल्या १७ वर्षांत मोठा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज, तपास सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर: विहीर चोरीला गेल्याचे सांगत माझी विहीर शोधून देण्याची मागणी करणारा प्रसंग आपण एका मराठी चित्रपटात पाहतो. याच प्रसंगाला साजेसा प्रकार कल्याण तालुक्यातील पोई गावात समोर आला आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून १७ वर्षे जंगलात झाडांची मशागत, लागवडसोबतच सभामंडप आणि समाज मंदिर बांधण्याचे काम कागदोपत्री झाले. प्रत्यक्षात मात्र काहीही अवतरले नाही. नव्याने आलेल्या वन व्यवस्थापन समितीने कागदांची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वन विभागाची चौकशी समिती तक्रारीवरून तपास करते आहे. या प्रकरणात कोटय़वधी रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता आहे.

 जिल्ह्यातील भेंडीचे पीक घेणारे गाव म्हणून ओळख असलेले पोई हे कल्याण आणि बदलापूर शहरापासून जवळ आहे. पोई गावाच्या शेजारी सुमारे ५६५ हेक्टर जंगल असून २००४ पासून संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या जंगलाची देखभाल केली जाते. वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वृक्षांची लागवड, त्यांची   देखरेख करणे अशी कामे केली जातात. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी नव्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने कारभार हाती घेतला. नव्याने समितीत आलेल्या सदस्यांनी गेल्या १७ वर्षांत वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती माहिती अधिकारात मिळवली. या कागदपत्रांवरून कोटय़वधी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यानुसार करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे आता तपास सुरू करण्यात आला असून त्यातून मोठा अपहार उघड होण्याची शक्यता आहे.

अपहाराची  प्रकरणे

समितीने वनक्षेत्रात झाडांची लागवड करणे, त्यांची मशागत करणे ही कामे मजुरांद्वारे वेळोवेळी केली. विशेष म्हणजे या मजुरांच्या यादीत  वामन हिंदूोळे, लक्ष्मण वाघचौरे, जनार्दन सरमत, सुमन जाधव आदी ग्रामस्थांची नावे होती. ज्यांनी कधीही जंगलात मशागतीचे काम केले नाही. त्यांना मोबदलाही मिळाला नाही.

२००८ वर्षांत सभामंडप बांधण्याचा ठराव झाला आणि त्याचे बांधकामही झाले. दुसऱ्याच वर्षी समितीने समाज मंदिराच्या नूतनीकरणाचा ठराव मंजूर केला. कागदावर सर्व सोपस्कार पूर्ण करून समाज मंदिराचे नूतनीकरण झाल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र सभामंडप आणि समाज मंदिराचे नूतनीकरण झालेच नाही. प्रत्यक्षात गावात अशा कोणत्याही  वास्तू अस्तित्वात नाहीत. 

पोई गावातील सध्याच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी यापूर्वीच्या समितीकडून झालेल्या कारभाराबाबत सविस्तर तक्रार दिली आहे. वन विभागाच्या चौकशी समितीकडून या प्रकाराची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल.  –  संजय चन्ने, वन क्षेत्रपाल, कल्याण

यापूर्वीच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून झालेल्या गैरव्यवहारांची आम्ही पुराव्यानिशी माहिती संकलित केली आहे. स्थानिक पोलिसांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ही माहिती आणि तक्रार देण्यात आली आहे. या सदस्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.

 – ज्ञानदेव बुटेरे, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती  

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millions of forest works cultivation works on paper only estimates of major abuse akp
First published on: 22-02-2022 at 00:02 IST