ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. या निवडीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका सभागृहात येऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर शिवसेनेने केलेल्या जल्लोषात सहभागी होताना ठाण्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले. तसेच लवकरच ठाण्यात विजयी मेळावा घेऊन आपण ठाणेकरांपुढे नतमस्तक होऊ असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या इतिहासात शिवसेनेला यंदा प्रथमच स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. उमेदवारांची निवड करताना घराणेशाहीला झुकते माप दिल्याने शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका झाली होती. महापौरपदाची निवड करताना एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानत मातोश्रीवरून मीनाक्षी शिंदे आणि रमाकांत मढवी या निष्ठावंतांना प्राधान्य देण्यात आले. महापालिकेत पुरेसे संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादी, भाजप या दोन्ही पक्षांनी महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार रिंगणात उभे केले होते. भाजपतर्फे महापौरपदासाठी आशादेवी सिंग आणि उपमहापौरपदासाठी मुकेश मोकाशी यांनी अर्ज भरले होते. राष्ट्रवादीतर्फे महापौरपदासाठी अशरीन राऊत आणि उपमहापौरपदासाठी आरती गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते. तर काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला होता.
ठाणेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही : उद्धव
ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यामुळे आनंद, समाधान आणि दाटून आले आहे, अशा भावना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. कुणाचे वारे किंवा हवा असली तरी ठाणेकर मात्र शिवसेनेच्या पाठीमागे खंबीर उभा राहिला आहे. ठाणेकरांचे आशीर्वाद आणि विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवडणूक केल्याने विरोधी पक्षांना धन्यवाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून मागे घेणारा भाजप तुमचा विरोधी पक्ष आहे का, याविषयी मात्र त्यांनी बोलणे टाळले.