डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील कोपर उड्डाण पुलाजवळ मंगळवारी सकाळी सात वाजता कोपर पुलावरुन भरधाव वेगाने येत असलेल्या एक मिनी बसने साऊथ इंडियन शाळेसमोर दोन धावत्या रिक्षा, दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन रिक्षा रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या तर दुचाकी स्वार रस्त्यावर पडले. या धडकेमध्ये तीन विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

मिनी बसचे ब्रेक फेल झाल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांनी दिली. मिनी बसच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघातात एकूण किती जण जखमी आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत. घटनास्थळी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दाखल होऊन पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.सकाळी सातची वेळ असल्यामुळे साऊथ इंडियन शाळा परिसरात वाहने, विद्यार्थी, पालक यांची गर्दी कमी होती. हाच प्रकार साडे सात वाजता झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असे शाळेबाहेरील पालकांनी सांगितले.

डोंबिवली पर्व भागातून एक मिनी बस मंगळवारी सकाळी कोपर उड्डाण पुलावरुन प्रवासी वाहतुकीसाठी पश्चिमेत येत होती. सकाळी रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी असल्याने बस चालक भरधाव वेगाने बस चालवित होता. कोपर पुलाच्या उतारावर आल्यावर बसचा वेग अधिक होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. उतारावर असताना बसचा ब्रेक फेल झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस वेगाने उतारावरुन साऊथ इंडियन शाळेच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाऊन समोरून चाललेल्या दोन रिक्षा, दुचाकी स्वारांना वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की मोठा आवाज होऊन रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना कोपर पुलाजवळ मोठा स्फोट झाल्याचे जाणवले. या धडकेत दोन ते तीन शाळकरी विदयार्थी, रिक्षा चालक, दुचाकी स्वार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यार्थ्यांची नावे समजली नाहीत. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

हेही वाचा : माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना खासदाराचं पत्र

विष्णुनगर पोलिसांना ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. अपघात झाल्यानंतर या भागात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही कोंडी सोडविली.

हेही वाचा : कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपर पुलाच्या उतारावर साऊथ इंडियन शाळेच्या दिशेने दोन गतिरोधक बसविण्याची मागणी पालकांकडून, काही वाहन चालकांनी केली. कोपर गावकडून येणारे रिक्षा चालक, खासगी वाहने भरधाव वेगाने रेल्वे स्थानक दिशेने जातात. त्याचवेळी रेल्वे स्थानकाकडून येणारी वाहने भरधाव वेगाने कोपरकडे जात असतात. याच वेळी कोपर पूल उतारावरुन भरधाव वेगाने वाहन कोपर किंवा दिनदयाळ रस्ता जात असेल तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागात गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.