ठाणे : गेल्या काही वर्षात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे दोन्ही नेते पक्षाने आयोजित केलेल्या ‘संकल्प से सिद्धी तक’ या कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी एकमेकांपासून दूर उभे होते. दोघेही दिप प्रज्वलनकरिता पुढे येत नसल्याचे पाहून वनमंत्री गणेश नाईक यांनी दोघांनाही पुढे येण्यास सांगितले. परंतु दोघेही पुढे येत नसल्याने मंत्री नाईक यांनी दोघांना दरडावत ‘मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे’, असे सांगितले आणि त्यानंतर दोघेही दिप प्रज्वलनसाठी पुढे आले.
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद गेल्या काही वर्षात वाढला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कपिल पाटील यांनी थेट आमदार किसन कथोरे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली होती. आपल्या पराभवाला कथोरेच जबाबदार असल्याचे पाटील यांनी अनेकदा बोलताना उघडपणे सांगितले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही हा संघर्ष सुरूच राहिला. कथोरे यांनी आपल्या विजयानंतर माजी लोकांना परत आजी होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. त्यानंतर सातत्याने दोन्ही भाजप नेते एकमेकांवर उघड टीका करताना दिसले. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. शुक्रवारीही भाजपच्या कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित होते पण, ते एकमेकांपासून दूर उभे असल्याने त्यांच्यातील कटूता कायम असल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे येथील वर्तकनगर भागातील भाजपच्या विभागीय कार्यालयात शुक्रवारी ‘संकल्प से सिद्धी तक’ ही कार्यशाळा पार पडली. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि नितेश राणे यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यशाळेत ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आजी-माजी जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, आजी-माजी आमदार आणि खासदार हे उपस्थित होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी पक्षातील नेत्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येत होते. परंतु एकमेकांपासून दूर उभे असलेले कथोरे आणि पाटील हे दोघेही पुढे येत नव्हते. हे पाहून गणेश नाईकांनी दोघांनाही दिप प्रज्वलनासाठी पुढे येण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही दोघे पुढे येत नसल्यामुळे नाईकांना अखेर दोघांना दरडावले आणि ‘मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे’, असे सांगितले. त्यानंतर कपील पाटील पुढे आले आणि दिप प्रज्वलन केले आणि त्यानंतर कथोरे यांनी दिप प्रज्वलन केले.