लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या इतर नेत्यांबरोबर डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांचेही नाव चर्चेला येत आहे. शनिवारी ते तातडीने दिल्ली येथे गेल्याची चर्चा समाजमाध्यमांवर पसरली होती. काही माध्यमांनी याविषयी बातम्या चालविल्या. या सगळ्या अफवांवर स्पष्टीकरण देताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मात्र, मी डोंबिवलीतच आहे, मी दिल्लीला गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण ट्विटर (एक्स) च्या माध्यमातून रविवारी दिले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. मी दोन दिवसात किंवा मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही, असे स्पष्टीकरण देऊन नेते चव्हाण यांनी सुरू असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीतील रिअल इस्टेट कंपनीच्या सदस्यांकडून मुंबईतील व्यावसायिकाची १० कोटीची फसवणूक

आठवडा होत आला तरी राज्याचा मुख्यमंत्री ठरत नसल्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेच्या माध्यमांतून अफवा पसरत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्याच्या जोरदार हालचाली दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात सुरू आहेत. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबरोबर, या चर्चेबरोबर मराठा चेहरा महाराष्ट्राला देण्याची गरज असल्याच्या चर्चा भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात आहेत.

मध्यप्रदेश, हरियाणाचा अनुभव भाजप नेत्यांच्या गाठीशी आहेत. या राज्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाच्याही स्वप्नात, मनात नसलेले चेहरे भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदावर बसवून त्या त्या राज्यातील भाजपच्या इच्छुक, मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी सज्ज असलेल्या नेत्यांना हादरे दिले होते. आता तीच परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली जात आहे की काय, अशी धाकधूक भाजपच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे.

आणखी वाचा- कल्याणमध्ये मुरबाड रोडवर महिलेचे मंगळसूत्र खेचून दुचाकीस्वारांचा पळ

राज्य भाजपमधील एक मोठा गट मात्र देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, यासाठी देव पाण्यात बुडवून बसला आहे. तर, मराठा आरक्षण, आंदोलने विचारात घेता मराठा चेहरा महाराष्ट्राला असावा या चर्चा आणि अफवांच्या माध्यमातून भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे, मंत्री रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरिश महाजन यांची नावे विविध माध्यमांतून चर्चेला येत आहेत. मोहोळ यांनी समाज माध्यमातून आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शनिवारपासून रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आल्याने, अखेर चव्हाण यांना आपण दिल्लीत गेलेलो नाही आणि डोंबिवलीत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर घडलेल्या सर्व गुप्त हालचालींचे सूत्रधार म्हणून रवींद्र चव्हाण यांनी पार पाडलेली जबाबदारी. कोकणासह, ठाणे, कोकणपट्टीवरील त्यांची हुकमत आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेथे जेथे जोरकसपणे प्रचार केला. तेथील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आले. ते चौथ्यादा निवडून आले आहेत. ठाणे जिल्ह्याचे राज्य कारभारतील महत्वाचे स्थान विचार घेता, जिल्ह्यावर आता भाजपची हुकमत वाढविण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत येत असावे, असे सांगत भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर मात्र, या सगळ्या अफवाच आहेत. दोन दिवसात खरे काय ते चित्र पुढे येईल, असे सांगितले.