बदलापूर: वसईत ज्याप्रमाणे आयुक्तांवर कारवाई झाली त्याप्रमाणेच कारवाईच्या प्रक्रियेला बदलापुरात सुरुवात झाली आहे. जनतेच्या पैशांची चोरी खपवून घेतली जाणार नाही. पालिकेचा पैसा कुणाच्या घरात चालला आहे ते लवकरच कळेल. पालिका निवडणुकात चौकाचौकात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार, असा इशारा मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे. पालिकेत अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. सध्या शिवसेना आणि आमदार किसन कथोरे यांच्या मध्ये युद्ध पेटले आहे.
स्वातंत्रदिनी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा पालिकेत गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी जी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल त्यात मी सांगितलेल्या आक्षेपार्ह गोष्टीही असतील, असेही आमदार किसन कथोरे म्हणाले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वीच आमदार किसन कथोरे यांनी आपल्या प्रचाराची दिशा निश्चित केल्याचे बोलले जाते.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवून विविध मुद्द्यांवर आक्षेप घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार किसन कथोरे यांनी पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला होता. प्रभाग रचना करताना आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप करत आमदार किसन कथोरे यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रारही दिली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र पालिका प्रशासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसारच प्रक्रिया केली असल्याची माहिती दिली होती.
शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा या प्रभाग रचनेवर आक्षेप घेत याप्रकरणी तक्रार दिली असून त्यावर समिती स्थापन करण्याची मागणी केली. येत्या १८ ऑगस्ट रोजी ही प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. मी आक्षेप नोंदवल्याप्रमाणे यात सर्व गोष्टी समोर येतील. प्रभाग रचना करताना नदी, महत्त्वाचे नाले, महत्त्वाचे मार्ग ओलांडायचे नसतात. मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रभागात सेटिंग झाली आहे. आणि ज्यांना यामुळे फायदा होणार आहे तेच लोक आता सगळीकडे सांगू लागले आहेत की आमचा प्रभाग सुरक्षित झाला आहे. त्यामुळेच ही बाब उघडकीस आली आहे, असे किसन कथोरे म्हणाले.
शहरात विकास कामांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. विकास कामांचे दहा दहा लाखांचे तुकडे केले जात आहेत. त्यातून बोगस कमी सुरू आहेत. हा नागरिकांच्या मेहनतीचा कर रूपातला पैसे कुणाचा घरात जातो आहे. पालिका निवडणुकीवेळी चौकाचौकात हा उघड केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यात कुणाचा सहभाग आहे हे लवकरच समोर येईल. वसईत जशी आयुक्तांवर कारवाई झाली तशीच इकडेही होईल असेही कथोरे म्हणाले. गेल्या काही महिन्यात आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यात मोठा संघर्ष वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
ही निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचार असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या आधीच किसन कथोरे यांनी पालिकेची दिशा स्पष्ट केल्याचे बोलले जाते.