पाच जणांच्या अटकेनंतर पोलीस तपासही थंड
ठाणे : दिवा येथील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्व योजनेतील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी इम्रान जुनेजा उर्फ मुन्ना मर्चट याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. वरवर पहाता हे प्रकरण काही दलालांशी संबंधित असल्याचे चित्र निर्माण जात असले तरी हा घोटाळा महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएने भाडेतत्त्वावरील योजने अंर्तगत सदनिकांची उभारणी केली असून या सदनिका एमएमआरडीएने पालिकेकडे वर्ग केल्या आहेत. अशाचप्रकारच्या दिवा भागातील दोस्तीच्या भाडेतत्त्वावरील सदनिका वाटप करण्यात आल्या आहेत. मुंब्रा शहरात रस्ता रुंदीकरण तसेच इतर प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबीयांना महापालिकेने या सदनिका दिल्या आहेत. परंतु काही नागरिक लाखो रुपये भरून बनावट कागदपत्रांच्या आधारे या सदनिकांमध्ये राहत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या मुन्ना मर्चट याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. झडतीदरम्यान त्याच्याकडे १४ घरांच्या किल्ल्या, काही बनावट कागदपत्रे, नावांची यादी आढळून आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. इम्रान हा मुंब्रा येथील खडी मशीन रोड परिसरातील एका चाळीमध्ये राहतो. पोलिसांना त्याच्या घरामध्ये २१ बनावट शासकीय शिक्के, एमएमआरडीए सदनिका वाटप आदेश असे लिहिलेल्या ९९ पुस्तिका, एमएमआरडीएचे लहान आकाराचे स्टीकर पेपर, संकुलाचे लेटरहेड, टोरंट कंपनीच्या अभियंत्यांची नावे असलेले अर्ज असे साहित्य सापडले.
आंदोलनाचा इशारा
दिवा भागातील सदनिका प्रत्यक्षात पी.ए.पी.च्या लाभार्थ्यांना मिळणे क्रमप्राप्त असतानाही त्या सदनिकांचे वाटप करताना मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या सदनिका देताना खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सव्र्हे, चाव्यांचा घोळ मोठय़ा प्रमाणात झालेला आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याने घरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही. त्यामुळेच या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून त्यात संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी. याबाबत येत्या सोमवापर्यंत निर्णय घेतला नाहीतर महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा पालिकेचे विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी दिला आहे.