ghodbunder road : ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ नंतरच घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता त्याची अमलबजावणी होईल का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. याविषयी मनसेने आपली भूमिका जाहीर करत थेट इशारा दिला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी जर अवजड प्रवेशबंदीचे आदेश प्रशासनाने पाळले नाही तर रात्री १२ पूर्वी येणारी अवजड वाहने फोडू असा इशाराच दिला आहे.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून वाहतुक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. या विषयावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. आमच्याकडून रस्त्यासाठी कर घेतात. मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केले तर कारवाई का केली जाते. आम्हाला व्यवस्थापन पुरविण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंची उत्तम व्यवस्था का नाही केली. महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहन तळ बांधले. परंतु तेथेही पे-अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहचण्यासाठी चार ते साडे चार तास लागतात. ठाण्यात वाहतुक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे असे जाधव म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतरही जर अवजड प्रवेशबंदीचे आदेश प्रशासनाने पाळले नाही. तर रात्री १२ पूर्वी अवजड वाहने रस्त्यावर आली तर ती अवजड वाहने आमचे मनसैनिक फोडतील असा इशारा जाधव यांनी दिला.
सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते
– यापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डिसेंबरपर्यंत ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करा असे आदेश दिले होते. दुसऱ्या दिवशी देखील अवजड वाहने सुरु होती. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊनही ठाण्यात अवजड वाहतुक सुरु होती. नक्की सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते असा प्रश्न निर्माण होत आहे असे जाधव म्हणाले.
सीसीटीव्ही द्वारे वसूली (ghodbunder road)- ठाण्यात सीसीटीव्हीद्वारे ई चलान कारवाई केली जात आहे. परंतु ही वसूली आहे. सर्वसामान्य नागरिकांना चांगले रस्ते, वाहनतळ, वाहतुक कोंडी मुक्त रस्ते दिले पाहिजे. हे नियम प्रशासन का नाही पाळत असा प्रश्न त्यांनी केला.