ठाणे : ठाण्यात वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाल्याने मंगळवारी पत्रकार परिषद घेत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शनिवारी लाँग मार्च काढण्याची घोषणा केली आहे. या मार्चमध्ये सर्व सामाजिक संस्था, गृहसंकुलातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केले.
ठाण्यात मागील काही दिवसांपासून वाहतुक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण झाली आहे. या विषयावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. आमच्याकडून रस्त्यासाठी कर घेतात. मग वाहन तर रस्त्याकडेला पार्क केले तर कारवाई का केली जाते. आम्हाला व्यवस्थापन पुरविण्याचे काम सरकारचे आहे. पार्किंची उत्तम व्यवस्था का नाही केली. महापालिकेने वाहने उभी करण्यासाठी गावदेवी येथे वाहन तळ बांधले. परंतु तेथेही पे-अँड पार्क धोरण आहे. महापालिकेने मोफत वाहनतळ उभे केले नाही. भिवंडीहून ठाण्यात पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. वसईहून ठाण्यात पोहचण्यासाठी चार ते साडे चार तास लागतात. ठाण्यात वाहतुक कोंडीची अत्यंत वाईट समस्या आहे असे जाधव म्हणाले.
इमारती बांधण्यास निर्बंध घाला
- ठाण्यात इमारती बांधण्यासाठी निर्बंध घाला. त्यांना परवानगी कशी दिली जाते, येथे राहणारे रहिवासी कोणत्या रस्त्याने जाणार याचा विचार करणे आवश्यक आहे. ठाण्यात मोठे गृहसंकुले उभी राहत आहेत. ठाण्यात नियोजन होत नाही असा आरोप जाधव यांनी केला.
मुख्यमंत्रीपद मिळूनही ठाण्याला काही मिळाले नाही
- ठाण्यात कोणताही नवीन प्रकल्प आलेला नाही. ठाण्यात कट्टे बांधले जातात. त्यातच वाचनालय बांधले जातात. ठाणे शहराचे मुख्यमंत्री होते. परंतु त्यानंतरही ठाणेकरांना काही मिळाले नाही.
अवजड वाहने बंद करुन प्रश्न सुटणार नाही
- अवजड वाहने बंद करुन ठाण्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. अवजड वाहनांना बायपास करण्यासाठी मार्ग उभारावा लागेल. अन्यथा कोंडीचा प्रश्न तसाच राहील. ठाण्याच्या सॅटीसचे पाच वर्षांपासून काम सुरु आहे. हे काम तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील हे काम आहे. त्यांच्या मतदारसंघात प्रशासन काम करत नसेल. तर कंत्राटदाराला आमच्या हातात द्या असेही ते म्हणाले.
पोलीस आता अंगरक्षक
- ज्या व्यक्तीला घराबाहेरचा कुत्रा देखील मारणार नाही. तशा लोकांसाठी अंगरक्षक म्हणून पोलीस नेमण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात पोलिसांची संख्या अपुरी आहे. सत्ता म्हणून उपभोग घेत असल्याचे दिसत आहे असेही जाधव म्हणाले.