Ghodbunder Road : ठाणे – मुंबई, ठाणे, पालघर, गुजरात या भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कोंडी होत आहे. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने डोंगर भागातून येणारे पाणी रस्त्यावर पाणी साचत आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून त्यात सोमवारी झालेल्या पावसामुळे कोंडीत भर पडली. यावरूनच मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली आहे.
मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी घोडबंदर हा महत्वाचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून ठाणे, मुंबई, पालघर, मिरा-भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक सुरू असते. या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी, मेट्रो प्रकल्प अशी कामे सुरू आहेत. यामुळे कोंडी होत असून त्यात मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कोंडी होत आहे. तसेच या मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने कोंडीत वाढ होत आहे. यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आता पावसाचा जोर वाढल्याने कोंडी वाढली आहे.
ठाण्याच्या घोडबंदर मार्गांवरील गायमुख ते वर्सोवा चौक (फाउंटन हॉटेल) पर्यंतचा साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची दुरावस्था झाल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खड्डे भरणीचे आदेश दिले होते. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार तीन दिवस अवजड वाहनांना बंदी घालून घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती प्रशासनाने पूर्ण केली. मात्र ठाण्यावरून घोडबंदरकडे येणाऱ्या मार्गाचे काम अद्याप प्रलंबित आहे. असे असतानाच सोमवारी पावसाचा जोर वाढला आणि यामुळे डोंगर भागातून येणारे पाणी रस्त्यावर साचले. यामुळे या मार्गावर कोंडी झाली.
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेना गावापासून पुढे फाउंटन हॉटेल परिसरात रस्त्यावर पाणी साचत आहे. डोंगर उताऱ्यावरून वाहून येणारे पाणी रस्त्यावर साठत आहे. यामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने कोंडी होत आहे. वाहनांच्या रांगा लागत असून दोन ते अडीच तास प्रवासासाठी लागत आहेत. सोमवारीसुद्धा हेच चित्र होते. यावरूनच मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावरून सत्ताधाऱ्यांवर टिका केली आहे. “ओवळा नाका ते फाउंटन हाॅटेल अडीच तास लागले, ठाण्याचा विकास जोरात चालू आहे”, अशी टिका जाधव यांनी केली आहे.