ठाणे : दोन्ही भावांना एकत्र पाहण्याची इच्छा होती. ही इच्छा आज पूर्ण होत असल्याची प्रतिक्रिया मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली. मराठी भाषेला आई म्हणतो, या आईमुळे दोन्ही मुल एकत्र येत आहेत. त्या आईने या दोघांना एकत्र आणले आहे असेही अविनाश जाधव म्हणाले. मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी येथे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसले.
शुक्रवार रात्रीपासून राज्यातील मनसेचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन या मेळाव्यासाठी मेहनत घेत होते. ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शुक्रवारी रात्री ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची भेट घेऊन मेळाव्याच्या तयारी विषयी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.
शनिवारी मेळाव्याला जाताना अविनाश जाधव यांनी माध्यमांशी पुन्हा संवाद साधला. जाधव म्हणाले की, आपण मराठीला आई म्हणतो. आईमुळे आज दोन मराठी मुलं एकत्र येत आहेत. आज, मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण असेल कारण १९ वर्षानंतर आमची इच्छा, महाराष्ट्राची इच्छा आज पूर्ण होत आहे. ही विजयाची नांदी आहे. हा क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवला जाणार आहे. हे दोन्ही भाऊ मिळून महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन ठेवणार आहेत, असेही ते म्हणाले.