कल्याण – महाराष्ट्र सरकारी मधील विविध घोटाळे, मंत्री आणि त्यांचे विविध प्रकारचे उद्योग ज्या पध्दतीने बाहेर येत आहेत. राज्य सरकारचा दर्जा घसरलेला कारभार आता ज्या पध्दतीने सुरू आहे, ते पाहता क्रीडा खात्याला आता नवीन वाद्गग्रस्त मंत्री मिळाला आहे. त्यामुळे यापूर्वीचे या मंत्री साहेबांचे उद्योग पाहता त्यांनी पत्त्यामधील रमीला राज्य खेळाचा दर्जा देऊ नये म्हणजे झाले, अशी उपरोधिक टीका मनसे नेते राजू पाटील यांनी राज्य सरकार आणि क्रीडा खात्याच्या नवीन मंत्र्यांवर नाव न घेता केली आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळ सभागृहात २२ मिनिटे पत्त्यामधील रमी खेळ आपल्या मोबाईलमध्ये खेळत असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. राज्याचा एक जबाबदार मंत्री विधिमंडळात रमी खेळ खेळतो या विषयावरून कृषीमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यातील नेते, नागरिक, शेतकरी यांच्याकडून समाज माध्यमांतून खरपूस टीका झाली.
या टीकेमुळे आणि मंत्री कोकाटे यांच्या ‘शासन भिकारी’ यांसारख्या विधानांनी राज्य सरकार अडचणीत आले. मंत्री कोकाटे यांच्या सततच्या वाद्गग्रस्त विधानांमुुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. मंत्र्यांनी अशाप्रकारची विधाने करणे चूक असल्याचे त्यांचे मत होते. या सगळ्या परिस्थितीत मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार अशी जोरदार चर्चा आणि तसे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी वर्ग मंत्री कोकाटे यांच्या बेताल वक्त्यांमुुळे संतप्त झाला आहे.
मंत्री कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून हकालपट्टी न करता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल अभय दिले. आणि शिक्षा म्हणून मंत्री कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून त्यांना कमी महत्वाचे क्रीडा खाते दोन दिवसांच्या घडामोडीत देण्यात आले. विधीमंडळ सभागृहात रमी खेळणाऱ्या एका मंत्र्याला राज्य सरकारने अभय देऊन त्यांची पुन्हा सरकारमध्येच क्रीडा खात्याच्या मंत्री पदी वर्णी लावल्याने राज्यातून तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. याच अनुषंगाने मनसेचे नेते राजू पाटील यांनी राज्य सरकारचा आताचा कारभार पाहता कोणाचा पायपोस कोणात नाही. कोण कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. गैरव्यवहाराची रोज नवनवी प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा परिस्थितीत या गोंधळात पत्त्यामधील रमी खेळाला राज्य खेळाचा घाईत दर्जा न मिळो म्हणजे झाले, अशी भावना व्यक्त करून राज्य सरकारच्या वाद्गग्रस्त मंत्र्याला क्रीडा मंत्रीपद दिल्याबद्दल टीका केली आहे.