डोंबिवली- विकास कामे, विकास कामांचा निधी, उद्घाटने, शिवसेनेची फलकबाजी यावरून शिवसेनेला अडिच वर्षापासून टीकेचे लक्ष्य करणारे कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी आनंद सेनेचे प्रणेते बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आ. पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायच ‘हिंदुत्व’, खरतर ‘ईडी’काडीची भीती. गद्दारांना क्षमा नाही ऐकल होते ठाण्यात. ४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात’.

गेल्या दहा वर्षापासून विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघात प्रचार करताना शिवसेना आणि मनसेचा नेहमीच उभा सामना रंगला. आरोप, प्रत्यारोपांचा राळी उडविण्यात आल्या. तेव्हापासून मनसे आमदार प्रमोद पाटील यांचा शिवसेनेवर टीका करण्याचा सीलसिला सुरू आहे. आता तर यापूर्वी मनसे आ. पाटील यांच्यावर पक्षीय, व्यक्तिगत पातळीवर टीका करणारे एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून फुटून बाहेर पडल्याने आ. पाटील यांना टीका करण्याची आयतीच संधी उपलब्ध झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे येथे घेतलेल्या जाहीर सभांमधून महाविकास आघाडी, त्यामधील नेते, मंत्र्यांवर सडकून टीका केली. या सभांनंतर मनसेने भाजपची पाठराखण सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात, जनमानसात सुरू झाली होती. पक्षप्रमुखच शिवसेना, महाविकास आघाडीतील नेत्या, मंत्र्यावर टीका करतोय म्हटल्यावर मनसेचे एकमेव आ. प्रमोद पाटील यांनीही चालून आलेली संधी साधून सेनेतील बंडखोरीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर प्रसारण सुरू केले आहे. यापूर्वी या ट्विटर प्रसारणात आ. पाटील यांना शिवसेनेकडून जशास तसा प्रतिसाद, उत्तर दिले जात होते.  आता असे तसे चित्र दिसत नसल्याचे समाज माध्यमी सांगतात.