कल्याण डोंबिवली पालिकेत २५ वर्ष सत्ता राबवून आता रस्ते ही आमचीच जबाबदारी आहे, असे काही लोकप्रतिनिधी सांगतात. रस्ते काय या शहरातील प्रत्येक नागरी समस्या, विकास कामांची जबाबदारी तुमची आहे. आतापर्यंत खोटी आश्वासने दिली. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्तेच काय विकास कामांची वाट लावली, अशी खरमरीत टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर केली आहे.

हेही वाचा- डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

डोंबिवली जवळील नांदिवली स्वामी समर्थ मठ भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. १० मिनीट पाऊस कोसळला तरी या भागातील रस्ते जलमय होतात. परिसरातील घरांमध्ये पाणी घुसते. खड्डेमय रस्त्यांमुळे नांदिवली भागातील रहिवासी, प्रवासी, वाहनचालक हैराण आहेत. नांदिवली भागातील रहिवासी संतप्त झाले असल्याने स्थानिक आमदार म्हणून पाटील यांनी नांदिवली पंचानंद, स्वामी समर्थ भागातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. संतप्त रहिवाशांनी आ. पाटील यांच्याकडे खड्डे, तुंबणारे पाणी, कचऱ्याने भरलेली गटारे याविषयी तक्रारी केल्या. या समस्या येत्या काही दिवसात सुटल्या नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी आमदार पाटील यांना दिला.

हेही वाचा- पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?

कल्याण डोंबिवली पालिकेत मूळ शिवसेना पक्षाची २५ वर्ष सत्ता आहे. चांगली विकास कामे केली असती तर लोकांना आता रस्त्यावर उतरण्याची आली नसती. आतापर्यंत फक्त नागरिकांना खोटी आश्वासने दिली. एकाही कामाची पुरेपूर अंमलबजावणी केली नाही. आता लोकांना रस्ते ही आमचीच जबाबदारी आहे असे छातीवर हात देऊन सांगता हे सगळे सांगताना रस्तेच काय या शहरांमधील प्रत्येक समस्या, विकास कामांची जबाबदारी तुमची आहे. २५ वर्ष कल्याण डोंबिवलीत तुम्ही सत्तेची फळे चाखली आहेत, अशी खरमरीत टीका पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर केली. पाटील यांच्या बोलण्याचा संपूर्ण रोख खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होता.

हेही वाचा- मीरा भाईंदरच्या माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात खा. शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना उद्देशून रस्त्यांची जबाबदारी कोणी ढकलत असेल तर रस्ते ही आमचीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही ढकलणार नाही असे वक्तव्य केले होते. मंत्री चव्हाण यांनी गेल्या महिन्यात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्ते हे सार्वजनिक बांधकाम, पालिका, एमएसआरडीसी यांच्या अखत्यारितील आहेत. प्रत्येक रस्त्याची जबाबदारी माझी नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असे सांगून कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला खा. शिंदे यांनी प्रत्युत्तर देऊन आम्ही जबाबदारी झटकत नाही, असे सांगून मंत्री चव्हाण यांना टोला लगावला होता. हाच धागा पकडून पाटील यांनी खासदार शिंदे यांना लक्ष्य केले.

हेही वाचा- भिवंडीच्या सुरेश म्हात्रे ( बाळ्यामामा) यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांची कुचंबणा खड्डे, या रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्यामुळे होते. या भागात पाणी तुंबू नये म्हणून येथे आपण स्वनिधीतून तीन उपसा पंप आणून बसविले होते. त्यामधील पालिकेने तीन उचलून नेले आहेत. स्वता काही करायचे नाही आणि दुसरा कोणी करत असेल तर त्यात अडथळे ही पालिकेची पध्दत आहे, अशी टीका आ. पाटील यांनी केली.
नांदिवली भागातील रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पालिका शहर अभियंता यांची भेट घेतली आहे. ते नवीन आहेत. त्यांना नांदिवली भागात पाणी तुंबू नये म्हणून कोठे गटारे नाल्यांना जोडावी लागतील याची माहिती दिली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांपेक्षा रस्त्यांचे पृष्ठभाग सुस्थितीत करण्याची आपली मागणी आहे. लोकांनी आंदोलन सुरू केले तर त्या आंदोलनाच्या अग्रभागी मी असणार आहे, असा इशारा पाटील यांनी प्रशासनाला दिला.

हेही वाचा- मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर मध्यरात्री अवजड वाहनांना बंदी, परंतु पर्यायी मार्गावर कोंडीचा भार

‘आपला खासदार दमदार खासदार’ प्रगतीला येणार वेग अशी खा. शिंदे यांचा गवगवा करणारा एक फलक बुधवारपासून समाज माध्यमावर फिरत आहे. त्याचाही समाचार रस्त्यांच्या विषयावरुन अप्रत्यक्षपणे पाटील यांनी घेतला. दांडिया आला की फक्त यांना रस्ते आठवतात. मग ते सगळं विसरुन जातात, असेही पाटील म्हणाले.