ठाणे – जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासासाठी महत्वाची असते. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडत असतो. मात्र सध्या ठाणे जिल्ह्यात असे होताना दिसून येत नाही. मागील वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ दोन वेळेस नियोजन समितीच्या बैठका घेतल्या आहेत. यामुळे आमच्या विकास कामांच्या प्रस्तावांचा आढावा कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक लोकप्रतिनिधीच हवा. स्थानिक पालकमंत्री असल्यास त्यांना भौगोलिक जाण असते. यामुळे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री बदलायला हवा. अशी थेट मागणी कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा >>> ठाणे जिल्हा नियोजन समितीला पालकमंत्र्यांची प्रतीक्षाच
तर स्थानिक लोकप्रतिनिधी पालकमंत्री असल्यास जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. यामुळे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले असते तरी योग्य ठरले असते. असे विधानही राजू पाटील यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना केले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात साताऱ्याचे शंभूराज देसाई यांची पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली होती. या निवडी पूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चाना मोठे उधाण आले होते. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या ऐवजी कुठेही चर्चेत नसताना शंभूराज देसाई यांची वर्णी लागल्याने सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात होते. तर यामुळे रवींद्र चव्हाण नाराज असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात होते. तर, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातत्याने गैरहजेरीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका बहुतांश वेळा रद्द कराव्या लागल्या आहेत.
मंगळवारी देखील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विकासकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळेस ही बैठक रद्द झाल्याने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे याना वेळ मारून नेत अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली. मात्र यामुळे आता जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत कल्याण ग्रामीणचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री बदलावा अशी थेट मागणीच केली आहे. तर जिल्हा नियोजन समिती जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासासाठी महत्वाची असते. या बैठकीच्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी विविध विकासकामांचे प्रस्ताव मांडत असतो. मात्र सध्या ठाणे जिल्ह्यात असे होताना दिसून येत नाही.
हेही वाचा >>> श्रावण महिन्यामुळे बाजारात केळीच्या पानांची आवक वाढली; डोंबिवलीतील बाजारात १० रुपयाला एक पान
आम्ही सादर केलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाचा आढावा कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ दोन वेळेस नियोजन समितीच्या बैठका घेतल्या आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक लोकप्रतिनिधीच हवा. ठाणे जिल्ह्याचा आवाका मोठा असल्याने स्थानिक पालकमंत्री असल्यास त्यांना भौगोलिक जाण असते. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागू शकतात. यामुळे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री बदलायला हवा. अशी मागणी कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधी पालकमंत्री असल्यास जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. यामुळे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केले असते तरी योग्य ठरले असते. असेही राजू पाटील यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना म्हंटले आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर राहण्याबाबत असलेली नाराजी आता समोर येऊ लागली आहे.