मुंब्रा येथील तनवरनगर भागात मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर शुक्रवारी मध्यरात्री तीन जणांनी दगडफेक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शाहजाद शेख (२२), शेहजान आगा (२६) आणि मोहम्मद शफीक (२६) या तिघांना ताब्यात घेतले आहे. परिसरातील गर्दुल्ल्यांनी हा प्रकार केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शाब्दीक चकमकी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असा दावा मनसेकडून केला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

राज ठाकरेंच्या सभेमुळे वातावरण तापलं

तनवर नगर येथे मनसेच्या वाहतूक सेनेचे कार्यालय आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे सभा झाली होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशीदींवरील भोंग्याबाबत वक्तव्य केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांवरही टीका केली होती. सभेच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी तनवर नगर येथील मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावरील फलक मनसेच्या पदाधिकाऱ्यास काढण्यास सांगितले होते. त्यामुळे परिसरात वातावरण चिघळले होते.

राज ठाकरे यांची सभा आता ठाणे शहरात आयोजित करण्यात आली आहे. या सभेवरूनही राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समाजमाध्यमांवर वाद सुरू आहेत. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास तीन जणांनी मनसेच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयावर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हे कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता.

मुंब्र्यात मनसेच्या शाखेवर दगडफेक; राज ठाकरेंच्या सभेआधी ठाण्यात वादाची चिन्हं

सीसीटीव्हीच्या मदतीने तिघे ताब्यात

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून कौसा परिसरात राहणाऱ्या शाहजाद, शेहजान आणि मोहम्मद या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी अमली पदार्थांच्या नशेमध्ये असताना हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु याप्रकारामुळे मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मनसे अंगावर आली तर शिंगावर घेऊ”

“राष्ट्रवादीचा या दगडफेकीशी काहीही संबंध नाही. मनसेच्या कार्यालयाबाहेर सहा सीसीटीव्ही हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बसविले होते. कारण आम्हाला अपेक्षित होते की, कोणीतरी समाजकंटक आक्षेपार्ह कृत्य करेल आणि त्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर निष्ठा ठेवणारा पक्ष आहे. परंतु मनसे अंगावर आली तर त्यांना शिंगावर घ्यायला राष्ट्रवादी सक्षम आहे. त्यामुळे कोणीही १२ तारखेनंतर आम्ही चोपून काढू अशा वल्गना करू नये. त्यांच्या चोपाला आम्ही दुपटीने चोप देऊ”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी इशारा दिला आहे.