ठाणे : करोनाबाधित रुग्णाच्या उपचारावरून झालेल्या वादातून मनसेचे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे विभागाध्यक्ष महेश कदम आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने महापालिकेच्या डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी महेश कदम यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ठाणे महापालिका वैद्यकीय अधिकारी असोसिएशन या संघटनेने घटनेचा निषेध व्यक्त केला.
ठाण्यात राहणारे डॉ. राजेशकुमार निगम हे ठाणे महापालिकेत कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते वर्तकनगर येथील एका रुग्णालयात करोना चाचणी केंद्राचे कामकाज पाहतात.
रविवारी एक महिला आणि त्यांचा मुलगा तेथे करोना चाचणीसाठी आले होते. त्यांची चाचणी केली असता ते करोनाबाधित आढळून आले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे डॉ. राजेशकुमार यांनी त्यांना भाईंदरपाडा येथील विलगीकरण पाठविणार असल्याचे सांगितले.त्यानंतर दुपारच्या सुमारास महेश कदम यांनी डॉ. राजेशकुमार यांना मोबाइलवरून संपर्क साधला आणि या रुग्णांना ग्लोबल रुग्णालयात का पाठवत नाही अशी विचारणा करत शिवीगाळ केली. या प्रकारानंतर महेश कदम आणि त्यांचा सहकारी सूरज गुप्ता या दोघांनी रुग्णालयात येऊन डॉ. राजेशकुमार यांना मारहाण केली. याप्रकरणी डॉ. राजेशकुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनीही महेश कदम आणि सूरज यांना अटक केली.
डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ठाणे महापालिका वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेतली. त्यावेळी डॉक्टरांना सुरक्षा देण्याचे आश्वासन महापौर म्हस्के यांनी दिले.
