डोंबिवली : गणपती जवळ आले तरी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाकडून खड्डे भरण्याची कामे करण्यात येत नाहीत. त्याचा निषेध म्हणून शनिवारी डोंबिवलीत इंदिरा चौक, ताई पिंगळे चौक भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात ढोलकी, टाळा वाजवित पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आरती केली. या आरतीच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांना गणपतीपूर्वी खड्डे बुजविण्याची सुबुध्दी देण्याची मागणी गणरायाकडे केली.

मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी गेल्या दहा दिवसापूर्वी पालिका अधिकाऱ्यांना पत्र देऊन शहरातील खड्डे भरण्याची मागणी केली होती. ही खड्डे भरणी आणि रस्ते सुस्थितीत केले नाहीतर रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याप्रमाणे शनिवारी सकाळी मनसेचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष राहुल कामत, विधानसभा क्षेत्र प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे, महिला संघटक मंदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली पूर्व इंदिरा चौक, ताई पिंगळे चौकात रस्त्यावरील खड्ड्यात बसून गणपतीची आरती ढोलकी, टाळांच्या गजरात गाऊन पालिका प्रशासनाचा निषेध केला.

या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून पालिकेने तातडीने खड्डे बुजविण्याची कामे सुरू करावीत असा इशारा देण्यात आला. या आंदोलनामध्ये शहरातील नागरिक सहभागी झाले होते. हे आंदोलन करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये म्हणून रामनगर पोलिसांनी शुक्रवारी राहुल कामत यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. पण नागरिकांना होणाऱ्या प्रश्नाच्या विषयावर आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. त्यामुळे आंदोलनाच्या विषयावर मनसे कार्यकर्ते ठाम होतेे.

शुक्रवारी सकाळी पालिकेच्या निषेधार्थ, टक्केवारी, ठेकेदारांच्या विरोधात घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी भरपावसात आंदोलन केले. यावेळी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले, प्रत्येकवेळी आम्ही जनतेचे कैवारी म्हणून पुढाकार घेणारे काही लोकप्रतिनिधी आता खड्डे या विषयावर का गुपचिळी धरून बसले आहेत. खड्ड्यांमुळे लोक हैराण आहेत. वाहतूक कोंडीने प्रवासी बेजार आहेत. रस्ते बांधणी करताना त्यामधील मलई खाऊन हे रस्ते बांधणी झाल्याने या रस्त्यांना सारखे खड्डे पडत आहेत आणि त्याचा चिखल आता बाहेर पडत आहे. येत्या निवडणुकांमध्ये हा खड्ड्यांमधील चिखल लोक रस्ते, खड्डेमध्ये टक्केवारी खाणाऱ्यांच्या तोंडावर फेकल्या शिवाय राहणार नाही.

शहराध्यक्ष राहुल कामत यांनी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत आहेत, असे सांगितले. पालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी खड्डे भरणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. गणपतीपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मनसे आंदोलनकर्ते जिल्हाध्यक्ष भोईर, शहराध्यक्ष कामत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांच्या उपस्थितीत दिले.