ठाणे Thane Health News : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना गाव-पाड्यातून उपजिल्हा रुग्णालयात जायचे म्हटले तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नाही. त्यामुळे मोठ्या आजाराच्या तपासणीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना रुग्णालयात जाणे परवडत नाही. परंतू, गेले काही महिन्यांपासून या गाव-पाड्यातील नागरिकांना गावातच मोठ्या आजारांची तपासणी करणे शक्य झाले आहे. फिरते निदान केंद्र (मोबाईल व्हॅन) च्या माध्यमातून गाव-पाड्यातील नागरिकांची कर्करोगाची वेळोवेळी तपासणी होत असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांची टीम गावात येऊन नागरिकांची तापसणी करण्यासह त्यांना योग्य तो सल्लाही देत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांची वेळेवर ओळख होत नाही. त्यामुळे अनेक जण निर्धास्तपणे वावरत असतात. मात्र, अचानक कर्करोगाचे (Cancer) निदान झाल्यावर मनात नको ती शंका निर्माण होते. त्यामुळे वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यावर यापासून बचाव करता येणे शक्य आहे. या मोबाईल व्हॅनमुळे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार मिळणे शक्य होत आहे. ग्रामीण भागात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात ३१ ऑगस्ट पर्यंत कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत २ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील विविध गाव-पाड्यांमध्ये एकूण २ हजार ४४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यांना पुढील तपासणी आणि उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.

आधुनिक उपकरणांनी सज्ज कर्करोग तपासणी मोबाइल व्हॅनमुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत, सुलभ आणि जलद तपासणीची सुविधा मिळत आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारावर प्रभावी मात करता येते, हे या उपक्रमामुळे स्पष्ट होत असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आले आहे.

कोणत्या कर्करोगाचे किती संशयित रुग्ण

कर्करोगाचा प्रकार संशयित रुग्ण

• मुख कर्करोग ०८

•स्तन कर्करोग: ०१

•गर्भाशय मुख कर्करोग १८

•इतर कर्करोग: ०५

एकूण ३२

असे आहे कर्करोग निदान फिरते केंद्र (मोबाईल व्हॅन)

या फिरते निदान केंद्रात (मोबाईल व्हॅन) कॉल्पोस्कोप, डेंटल चेअर आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असून, दोन डॉक्टर आणि सहा कर्मचारी कार्यरत आहेत. या मोबाईल व्हॅनमध्ये दररोज सरासरी १०० ते १२० नागरिकांची तपासणी केली जाते. फेब्रुवार २०२५ पासून जिल्ह्यात या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात येत आहे. या रुग्णांना पुढील निदान आणि उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात येते.