पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी ८ दिवस

ठाणे : कळवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे नववर्षांच्या पहिल्या आठवडय़ात लोकार्पण होणार असल्याचे दावे केले जात होते. मात्र या पुलाच्या अंतिम टप्प्यातील काम पूर्ण होण्यास आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर पुलाच्या उद्घाटनाची तारीख नक्की केली जाणार आहे.  कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान खारेगाव रेल्वे फाटक आहे. या फाटकाच्या पूर्व दिशेला आतकोनेश्वर नगर, भास्करनगर, वाघोबानगर, घोलाईनगर हा परिसर येतो.  कळवा पश्चिम भागात शाळा आणि मुख्य बाजारपेठ आहे. पूर्व भागात अशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पूर्वेतील नागरिकांना पश्चिम भागात येण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडून प्रवास करावा लागतो. यामुळे अपघातही होत असून लोकल वाहतुकीतही व्यत्यय येतो. या पार्श्वभूमीवर खारेगाव फाटकाजवळ रेल्वे उड्डाणपुल उभारणीचा निर्णय मध्य रेल्वे आणि ठाणे  महापालिकेने घेतला होता. रेल्वेने त्यांच्या हद्दीतील काम पूर्ण केली आहेत. तर जमिनीचे वाद तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे महापालिकेला उर्वरित कामे करता आली नव्हती.

वेळोवेळी या पुलाच्या पूर्ततेची तारीख लांबणीवर पडत असताना नववर्षांच्या पहिल्या आठवडय़ात पूल नागरिकांसाठी खुला होईल, असे खासदार श्रीकांत शिंदे  यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात पुलाचे काम अद्याप शिल्लक असून ते पुर्ण करण्यासाठी आठ दिवसांचा कालवधी लागणार आहे. त्यामध्ये जिन्याची अंतिम टप्प्यातील कामे, रेलिंग, विद्युत दिवे बसविणे, अशा कामांचा समावेश आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवाद

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच पुलाचे उट्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. तर, या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी करत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे उद्घाटनावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र काही दिवसांपुर्वी दिसून आले होते.

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाची अंतिम टप्प्यातील कामे आठवडाभरात पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे काम पुर्ण झाल्यानंतर पालिका पदाधिकारी उद्घाटनाची तारीख ठरवतील आणि त्यानंतर हा पुल नागरिकांसाठी खुला होईल.

– संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका