कल्याण – टिटवाळा येथे राहणाऱ्या एका तरूणाचा मोबाईल अन्य एका तरुणाने चोरला. चोरीच्या मोबाईलमधील गुगल पे उपयोजनाचा वापर करून चोरी केलेल्या तरुणाने गुगल पेचा गुप्त संकेतांक शोधुन त्या माध्यमातून मोबाईलधारकाच्या बँक खात्यामधुन सात हजार रूपयांची रक्कम आपल्या बँक खात्यात वळती करून घेतली आहे.
अजय महादेव चव्हाण यांनी ही तक्रार केली आहे. ते टिटवाळा येथे राहतात. चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक रतन पतंगे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आठ दिवसापूर्वी हा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वैशाली बार परिसरात घडला आहे.
अजय चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आठ दिवसापूर्वी आपण कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वैशाल बार भागात होतो. यावेळी आपल्या नकळत दीपक रतन पतंगे यांनी आपला मोबाईल चोरी केला. मोबाईल चोरी केल्यानंतर दीपकने त्या मोबाईल मधील गुगल पे उपयोजनचा वापर करून त्यामधील गुप्त संकेतांक शोधुन काढला. या गुप्त संकेतांकाचा वापर करून अजय चव्हाण यांच्या कोटक महिंद्रा बँक खात्यामधुन गुगल पेच्या माध्यातून दीपकने स्वताच्या बँक खात्यात सात हजार रूपये वळते करून घेतले.
दीपक पतंगेने आपला मोबाईल चोरी करून हे गैरप्रकार केल्याने अजय चव्हाण यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात या चोरी आणि फसवणूक प्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी दीपक विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत हुबे याप्रकरणाचा तपास करत आहेत.