डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभागात मिलापनगर, गणपती मंदिर परिसर, माॅडेल महाविद्यालय परिसरात एक माकड गेल्या काही दिवसांपासून संचार करत आहे. या माकडाच्या संचारामुळे या भागातील रहिवासी मात्र त्रस्त आहेत. अचानक घराच्या खिडकीत, बंगल्याच्या निवाऱ्यावर माकड धपाधप उड्या मारत आहे.
मागील काही दिवसांपासून या माकडाचा एमआयडीसी परिसरात मुक्काम आहे. यापूर्वी दिवाळी झाल्यानंतर मलंगगड पट्टा भागातील काही चुकारू माकडे कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात येत होती. यावेळी लवकरच हे माकड डोंबिवलीत शहरात आले आहे, असे एका प्राणीप्रेमीने सांगितले. हे माकड रस्त्यावरून, परिसरातील झाडांवर संचार करत आहे. माकडाच्या संचारामुळे बाहेर काही वस्तू ठेवणे मुश्किल झाले आहे, असे रहिवाशांनी सांगितले.
घरातील कपडे, वस्तू बंगले, इमारतीच्या गच्ची वाळत ठेवले की तेथे माकडाचे आगमन होते. ठेवलेल्या वस्तूवर माकड ताव मारते. ही गोष्टी संध्याकाळी गच्चीत वस्तू आणण्यास गेले की लक्षात येते. त्यामुळे हा माकडाचा त्रास अजून किती दिवस आहे, असे प्रश्न नागरिक करत आहे. गणपती मंदिरात भाविक बसले असताना तेथे माकडाचे आगमन होते. गणपती मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक जवळील केळी, खाऊ माकडांना टाकतात. लहान मुले, शाळेत जाणाऱ्या मुलांचे माकडामुळे मनोरंजन होत आहे.
माकड आले की परिसरातील कावळे इतर पक्षी जोरदार ओरडा सुरू करतात. कावळे माकडाचा पाठलाग करून त्याला आपल्या हद्दीतून हुसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र एमआयडीसी निवासी विभागात दिसत आहे. अनेक वेळा एमआयडीसीतील रस्त्यावरून माकड धावत असते त्यावेळी पादचाऱ्यांची पळापळ होते. पालक, विद्यार्थी रस्त्याच्या एका बाजुला होऊन माकडाला मार्ग मोकळा करून देतात.
काही दिवसांपासून माकडाचा एमआयडीसी परिसरात मुक्काम असल्याने या भागात माकड हाच चर्चेचा विषय झाला आहे. प्राणी प्रेमी आणि वन विभागाने या माकडाला जेरबंद करून पुन्हा त्याच्या मलंगगड मुक्कामी सोडण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक नागरिक आपल्या घराच्या खिडकीतून माकडाला केळी, पेरूच्या फोडी, घरातील खाद्य पदार्थ टाकत असल्याचे चित्र आहे. सकाळच्या वेळेत एमआयडीसीतील शाळांच्या भागात माकडाचे दर्शन विद्यार्थी, पालकांना होते. काही वेळा माकड इमारती, बंगल्यांच्या आवारातील वाहनांवर ऐटदारपणे बसलेले असते. त्यामुळे त्याला वाहनावरून हुसकताना वाहन मालकाची तारांबळ उडते.