भाईंदर : मागील काही दिवसांपासून समुद्रात वादळी वारे निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून गुजरातच्या मासेमारी नौकानी उत्तन व वसईच्या खाडी किनाऱ्याच्या आश्रयाला आल्या आहेत. या मच्छिमारांना स्थानिक मच्छीमारांकडून सहकार्य केले जात आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. या चक्रीवादळाला ‘मोंथा’ असे नाव देण्यात आले आहे.याचा परिणाम अरबी समुद्रात देखोली जाणवत आहे. या वादळीवाऱ्यामुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत.
दरम्यान उत्तन व वसईच्या बोटीना लागून गुजरातच्या बोटी देखील याठिकाणी आल्या आहेत.यात वीसहून अधिक बोटीचा समावेश आहे. २५ ऑक्टोबर पासून या बोटी किनाऱ्यावरच असून वातावरण शांत होण्याची वाट बघत आहेत.या मच्छिमारांकडे अन्न धान्य उपलब्ध असले तरी येथील स्थानिक मच्छीमारांकडून त्यांना इतर साहित्य पुरवले जात आहे.तर याबाबत सागरी किनाऱ्यावर देखील माहिती देण्यात आली असून सोय उपलब्ध करून दिली जात आहे. प्रामुख्याने बहुतांश वेळा आम्ही देखील गुजरातच्या किनाऱ्यावर जात असतो. त्यामुळे सहकार्याची भावना म्हणून आम्ही हीं मदत करत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक मच्छिमार संघटनांकडून देण्यात आली आहे.
मासेमारीच्या हंगामावर परिणाम
वसई विरार भाईंदर याभागातील मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. ऑगस्ट महिन्यापासून यंदाच्या मासेमारी हंगाम सुरू झाला होता. मात्र हंगाम सुरू झाल्यापासूनच समुद्रात वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे.त्यामुळे सातत्याने मच्छीमाराना आपल्या बोटी घेऊन माघारी परतावे लागत आहे. यावर्षी जवळ पास पाच ते सहा वेळा ऐन मासेमारीच्या हंगामात आपल्या बोटी बंद ठेवण्याची वेळ आली असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.
बोटी सावरताना ही कसरत
मोठ्या बोटी सोबत अगदी दैनंदिन मासेमारी करणाऱ्या ही छोट्या बोटी आहेत. वादळी वाऱ्यामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळत असतात. त्यामुळे अशा बोटी सावरत असताना ही या मच्छिमार बांधवांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बोटीचे नुकसान होऊ नये यासाठी काही मच्छिमारांनी आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी नांगरून ठेवल्या आहेत
