ठाणे : दीड लाख रुपयांसाठी आईने तिच्या तीन महिन्यांच्या मुलीची दलालांमार्फत विक्री करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आईसह नऊ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका केली असून बाळाला नवी मुंबई येथील विश्व बालक केंद्र येथे ठेवण्यात आले आहे. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये तृतीयपंंथी व्यक्तीचाही सामावेश आहे अशी माहिती उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
शालु शेख (२५) असे बाळाच्या आईचे नाव आहे. तर साहिल हुसेन, साहिदा शेख, खतजा सद्दाम हुसेन खान, प्रताप केशवानी, मोना खेमाने, सुनीता बैसाने, सर्जेराव बैसाने, राजु वाघमारे (तृतीयपंथी) अशी आरोपींची नावे आहेत. मुंब्रा येथील अमृतनगर भागात बाळांची विक्री करणारी टोळी असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन केले.
हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast: बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची पालिका रुग्णालय, कंपनी परिसरात शोधाशोध
पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करून मुंब्रा येथील सहिदा आणि साहिल या दोघांना संपर्क साधला. तसेच त्यांच्याकडे बाळाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी एक तीन महिन्यांची मुलगी असल्याचे सांगितले. बाळाच्या मोबदल्यात त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. २३ मे या दिवशी साहिदा आणि साहिल यांनी मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात बनावट ग्राहकाला पैसे घेऊन बोलावले. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून साहिल, साहिदा, खतजा, प्रताप, मोना, सुनीता आणि सर्जेराव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तीन महिन्यांचे बाळ होते. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांचे आणखी काही साथिदार नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, बाळाची आई शालु आणि तृतीयपंथी व्यक्ती राजु याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेची बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई; लोखंडी सांगाडे कटरच्या साहाय्याने भुईसपाट
आर्थिक परिस्थीत बिकट असल्यामुळे बाळाच्या विक्रीचा निर्णय
बाळाच्या आईची आर्थिक परिस्थीत बिकट होती. तसेच तिचा पती सांभाळ करत नव्हता. त्यामुळे तिने बाळाच्या विक्रीचा निर्णय घेतला होता. याबाबतची माहिती राजु याला मिळाली होती. त्याने त्याच्या इतर दलाल साथिदारांना याबाबत माहिती दिली होती. पाच लाख रुपयांपैकी बाळाच्या आईला दीड लाख रुपये, राजु याला दीड लाख रुपये आणि उर्वरित रक्कम इतर दलालांनी घेण्याचे ठरविले होते.