डोंबिवली – डोंबिवलीतील माऊंटेनिअर्स असोसिएशन या गिर्यारोहण संस्थेने शहापूर तालुक्यातील दुर्गम डोंगर पठारावरील साकडबाव, चिल्हारवाडी, पयारवाडी, बाबरे, चांग्याचापाडा येथील जिल्हा परिषद, खासगी शाळांमध्ये जाऊन आदिवासी मुले आणि कष्टकरी आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी सण साजरा केला.
दिवाळी सणानिमित्त शहरी भागातील लोक आपल्या गावात आल्याने आदिवासी भागातील मुले, ग्रामस्थांनी पारंपारिक पध्दतीने माऊंंटेनिअर्स संस्थेच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी गावात फेरी मारून आदिवासी पाड्यावरील नागरिकांच्या नागरी समस्या, तेथील अडचणी आणि त्यामधून काय पर्याय शोधता येतील यादृष्टीने पाहणी केली.
शाळांच्या आवारात झाडाखाली बसून कार्यकर्त्यांनी आदिवासी मुले, महिला आणि ग्रामस्थांंसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी महिला बचत गटांंनी तयार केलेला फराळ मुले, महिलांना वाटप करण्यात आला.
बाबरे, चिल्हारवाडी, पयारवाडी, साकडबाव भागातील आदिवासी पाड्यांवर पाण्याची भीषण टंचाई असते. महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून डोंगर चढउतार करून पाणी आणावे लागते. या भागात रोजगाराच्या संधी नाहीत. पाड्यावरील बहुतांशी रहिवासी कष्ट, मजुरी करून उपजीविका करतात. शिक्षण घेतले तरी पुढील दिशा नक्की नसल्याने अनेक मुले शिक्षण असुनही गावात बेरोजगार म्हणून फिरत आहेत. अशा अनेक गोष्टी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्या. यादृष्टीने मुलांना मार्गदर्शन, या भागातील मुलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील का यादृष्टीने चांगले नियोजन करण्याचा निर्णय माऊंटेनिअर्स संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतला.
आदिवासी मुले काटक असतात. त्यामुळे त्यांचे क्रीडाविषयक कौशल्ये विकसित करण्यासाठी क्रीडा विषयक साधने त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्यासाठी प्राथमिक उपचाराची साधने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमात माऊंटेनिअर्स संस्थेचे सतीश गायकवाड, अध्यक्ष दिलीप भगत, सचिव डाॅ. अमित कुलकर्णी, संस्थापक डाॅ. उज्जवला कुलकर्णी, डाॅ. सुनीता पाटील, सुवर्णा जोशी, कृपाली उचील, भूषण ठाकूर, मनीषा झगडे, ऋतुजा झगडे सहभागी झाले होते. याशिवाय आदिवासी भागातील स्थानिक शाळांचे दिनेश सुरोसे, आशा रणखांंबे, पूनम भडांंगे, ग्राम विकास अधिकारी हिरामण तरवारे सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ न्यू डोंबिवली, रोट्रॅक्ट क्लब ऑफ न्यू डोंबिवलीचे सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते.